सधन तालुक्यांची भूजल पातळी घटली
By admin | Published: December 13, 2015 11:15 PM2015-12-13T23:15:30+5:302015-12-14T00:08:24+5:30
विरोधाभास निसर्गाचा, की मानवनिर्मित? : वाळवा, शिराळा तालुक्यात घट; आटपाडीत झाली वाढ--लोकमत विशेष
शरद जाधव== सांगली --जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वेगाने घटत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक समृध्द समजल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील भूजल पातळीत २.६५ फुटाने घट झाली आहे, तर सर्वाधिक अवर्षणग्रस्त तालुका असलेल्या आटपाडी तालुक्यातील भूजल पातळीत अडीच फुटाने वाढ झाली आहे. हा विरोधाभास निसर्गाचा आहे की, मानवनिर्मित?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गेल्या दोन वर्षापासून मान्सूनने दगा दिल्याने जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात घट जाणवत आहे. यावर्षी सरासरीच्या केवळ ७१.३४ टक्के पाऊस झाल्याने टंचाई परिस्थितीला जिल्हा सामोरा जाणार आहे. दुष्काळी भागात सध्या काही पाणी योजनांतून आवर्तन सुरु असल्याने तसेच काही दिवसांपर्यंत आवर्तन सुरू असल्याने त्याचा फायदा या भागाला होताना दिसत आहे. मात्र जिल्ह्यातील पाऊसमानासह इतर सर्वच बाबतीत संपन्न असलेल्या या जिल्ह्यातील वाळवा, शिराळा तालुक्यात मात्र भूजल पातळीत कमालीची घट जाणवत असल्याने या भागातील बेसुमार पाणी उपशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भूजल पातळीचा आढावा घेण्याअगोदर जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाचा आढावा घेतला, तर जिल्ह्यात वर्षाला सरासरी ५१० मिलिमीटर पावसाची नोंद होते. त्यात यावर्षी जिल्ह्याची सरासरी ओलांडून शिराळा तालुक्यात ८८४.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वाळवा तालुक्यात ५६५.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याउलट सर्वात कमी पाऊस आटपाडी तालुक्यात झाला असून, ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आॅक्टोबरअखेर पावसाची नोंद आणि सरासरी प्रमाण पाहिले असता, सरासरीच्या केवळ ७१ टक्केच पाऊस झाला आहे. प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेसारख्या योजनांसह पाटबंधारे, कृषी विभागानेही योजना राबविल्या असल्या तरी, पाऊसमान कमी असल्याने भूजल पातळी घटत असल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करुन जिल्ह्यातील भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे. वर्षातून किमान चार वेळा भूजल पातळीचा अभ्यास करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २.६५ फुटाची भूजल पातळीची घट वाळवा तालुक्यात नोंदली गेली असून, पावसाने अथवा पाणी स्रोतांच्या माध्यमातून मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच तालुक्यातील पाणी पातळीत घट नोंदविली आहे. वाळवा तालुक्यातील उसाचे क्षेत्र आणि त्यासाठीच्या पाणी वापरामुळेही तालुक्यावर ही परिस्थिती ओढविल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
या सर्व चिंताजनक आकडेवारीत दिलासादायक चित्रही असून, बाराही महिने टंचाईचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील भूजल पातळीत २ फूट ६२ इंचाने वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही एक फुटाने वाढ झाली आहे. या दोन तालुक्यात अनुक्रमे टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी फिरल्याने, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
मिरज तालुक्याने मात्र समाधानकारक प्रगती केली असून तालुक्यात २.९५ फुटाने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण व जलस्रोतांवर वाढत चाललेला वाढत्या भरवशामुळे जिल्ह्यात केवळ टंचाईग्रस्त तालुकेच नव्हे, तर ‘पाणीदार’ तालुके म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांतही आता पाण्याचे नियोजन आवश्यक बनले आहे. शेतीसाठी पाण्याचा जपून वापर आणि विनाकारण पाणी उपसा थांबविल्यासच भूजल पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटण्यास मदत होणार आहे. अलीकडेच म्हैसाळ, टेंभूसह इतर पाणी योजनांच्या लाभक्षेत्रातील भागातही पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक बनले आहे.
वाळव्याबरोबरच शिराळा तालुक्यातील भूजल पातळीतही १.४१ फुटाने घट झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यात जलव्यवस्थापन अधिक सक्षमपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील जत, कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव तालुक्यातही सरासरी एक फूट ते अडीच फुटापर्यंत भूजल पातळीत घट नोंदविली आहे.
निसर्ग कोपला : यंत्रणा हतबल
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यानेही भूजल पातळी घटली आहे. जिल्ह्यात पाणी योजनांच्या आवर्तनामुळे टंचाई परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होत असताना, आता थकबाकीमुळे पाणी योजनांनीही माना टाकल्या आहेत. प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेतून कामे होत असली तरी, योजनेच्या कामात पाणी साठून राहण्यासाठी समाधानकारक पाऊस नसल्याने प्रशासकीय यंत्रणाही हतबल ठरली आहे.
विहिरींचे पुनर्भरण बनले आवश्यक
जिल्ह्यातील सात तालुक्यांतील भूजल पातळीत घट जाणवली असून, त्यावर उपाय करणे आवश्यक बनले आहे. त्यानुसार पाण्याची गरज ओळखून खोदलेल्या विंधन विहिरींचे पुनर्भरण केल्यानंतर भूजल पातळीत वाढ होणार आहे. कोणत्याही मदतीविना शेतकरी स्वत: विंधन विहिरींचे पुनर्भरण करू शकत असल्याने पाणी पातळी वाढविण्यास मदतच होणार आहे.
भूजल पातळीत तीन फुटांची घट नोंदविलेल्या वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेले उसाचे क्षेत्र व त्यासाठी लागणारा पाणी उपसा लक्षात घेता, पावसाने अथवा इतर जलस्रोतांच्या माध्यमातून जमिनीत मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा उपसा झाल्याचे सिध्द झाले आहे. पाण्याची गरज निर्माण झाल्यानंतर उपलब्ध स्रोतांचा वापर करण्याऐवजी तातडीने कूपनलिका खोदण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्यानेही भूजल पातळी चिंताजनक पातळीवर येऊन पोहोचली आहे.
जादा वापर
तालुकानिहाय भूजल पातळीत घट व वाढ (फुटात)