शाळेच्या विकासासाठी वर्गमित्रांची जमली गट्टी । नागज शाळेमधील उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:49 PM2019-06-08T23:49:12+5:302019-06-08T23:50:50+5:30
शाळेकडे पुन्हा पाऊल टाकून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दुर्मिळ होत असताना, नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील सिद्धेश्वर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासाकरिता पुन्हा
सांगली : शाळेकडे पुन्हा पाऊल टाकून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दुर्मिळ होत असताना, नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील सिद्धेश्वर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासाकरिता पुन्हा एकत्र येत नवा सेतू उभा केला आहे.
येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलमधील १९८९-९० च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी २९ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेतला. त्यात वर्गमित्रांच्या उन्नतीसाठी फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच नंदिनी देसाई विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
स्नेहमेळाव्याला माजी प्राचार्य एस. एम. कोरे, महानंदा स्वामी, आर. एस. स्वामी, बी. के.चव्हाण, एम. एस. हिंगसे, एस. एन. शिंदे, जे. के. गोंजारी, व्ही. जी. मिसाळ हे आठ निवृत्त शिक्षकही उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचलेल्या सतीश पाटील, सुवर्णा माने, विजय सरगर, गंगाराम रुपनर यांनी ‘आपण कसे घडलो’ हे सांगितले.
माजी विद्यार्थी तथा कंत्राटदार सतीश पाटील यांनी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या मित्रांच्या मदतीसाठी फाऊंडेशन स्थापन करण्याची कल्पना मांडली. त्याप्रमाणे वर्गमित्र कल्याण निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आभार रघुनाथ बोरकर यांनी मानले. प्राचार्य राजकुमार देसाई, माजी विद्यार्थी प्रकाश रुपनर, फत्तेसिंह पाटील यांनी संयोजन केले.