गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 03:25 PM2022-11-14T15:25:26+5:302022-11-14T15:51:00+5:30

कार्यकर्त्यांनी कोणत्याही नेत्यांच्या मागे फिरू नये. त्याचा तिकीट मिळण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. पक्षाने तिकीट देण्याचे धोरण बदलले

Group politics will not be tolerated in the district, Chandrasekhar Bawankule warned the bjp officials | गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला इशारा

गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला इशारा

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे. गटातटाचे राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो खपवून घेणार नाही. कितीही मोठा नेता असला तरी गटबाजीबद्दल तातडीने कारवाई करण्यात येईाल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथील मेळाव्यात दिला.

भाजपच्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा येथील भावे नाट्यमंदिरात पार पडला. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, गटबाजीचे राजकारण मला चालणार नाही. या गोष्टी कानावर आल्या तर कारवाई केली जाईल. याशिवाय जे पदाधिकारी किंवा नेते काम करणार नाहीत, त्यांच्याविषयीसुद्धा योग्य विचार केला जाईल. २०२४ मध्ये राज्यात आणि देशात भाजपचे सरकार यायचे असेल तर पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दररोज किमान दोन तास पक्षासाठी दिले पाहिजेत. प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला पक्षाचा कार्यकर्ता हक्काचा वाटला पाहिजे. हा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून, त्याचा आढावा जानेवारीमध्ये घेतला जाणार आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातून ८ आमदार आणि २ खासदार भाजपचेच असतील, असा विश्वास व्यक्त करून बावनकुळे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे मिळून आगामी निवडणुकीत ४५हून अधिक खासदार आणि २०० आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादीला संधिवाताप्रमाणे आलेली सत्तेची सूज आता उतरली असल्यामुळे गावागावांत पुन्हा शाखा सुरू करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राष्ट्रवादीवर वर्चस्व असणाऱ्या पवारांच्या घरातच फूट पडत चालली आहे.
ग्रामपंचायतीत पक्षाला चांगले यश मिळेल. तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आता परिस्थिती बदलली असून, येत्या निवडणुकीत एक धक्का मारण्याची गरज आहे, असे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले.

नेत्यांच्या मागे फिरू नका

बावनकुळे म्हणाले की, भविष्यात कार्यकर्त्यांनी कोणत्याही नेत्यांच्या मागे फिरू नये. त्यांचा सत्कारही करू नये. त्याचा तिकीट मिळण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. पक्षाने तिकीट देण्याचे धोरण बदलले आहे. त्यानुसार निवडणुकीत प्रत्येक उमेदवारीसाठी तीन जणांची नावे पाठवून त्यातील एक नाव सर्वेक्षणानुसार निश्चित होईल.

Web Title: Group politics will not be tolerated in the district, Chandrasekhar Bawankule warned the bjp officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.