वाढत्या धर्मांधतेमुळे देशाचा पाकिस्तान होईल - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:53 PM2022-04-20T16:53:33+5:302022-04-20T16:54:02+5:30
आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
इस्लामपूर : आपला देश धर्मांधतेकडे वाटचाल करीत आहे. असे झाल्यास त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही. आपल्या आजू-बाजूचे देश धर्मांधतेकडे झुकले आणि उद्ध्वस्त झाले आहेत. आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
इस्लामपूर येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अमोल मेटकरी, युवा नेते प्रतीक पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर उपस्थित होत्या.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी हा सर्व जाती-धर्माचा पक्ष आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढीला पुढे आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार यशवंतराव चव्हाण आणि पवारसाहेबांनी राज्याला दिला. कोल्हापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत २३ रोजी संकल्प सभेने या परिवार संवाद यात्रेचा समारोप होईल.
धनंजय मुंडे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहेत. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारे रयतेचे राजकारण करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल.
अमोल मेटकरी म्हणाले, खासदार शरद पवार यांच्या हृदयात छत्रपती आहेत. तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर यांची इतकी अॅलर्जी का? हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र आम्हाला तोंडपाठ आहेत. भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म व भक्ती शिकवू नये. राज ठाकरे तुम्ही अयोध्येला जाताना झेड प्लस सुरक्षा कवच घेऊन कशाला जाता? असा सवालही त्यांनी केला.