नव्या पिढीचे वाढते ज्ञान शिक्षकांसाठी आव्हान
By admin | Published: October 14, 2016 01:07 AM2016-10-14T01:07:48+5:302016-10-14T01:15:22+5:30
जयंत पाटील : जिल्हा परिषदेच्यावतीने २६ जणांचा ‘जिल्हा शिक्षक पुरस्कारा’ने सन्मान; शिक्षक भारावले
सांगली : सध्या मुलांमध्ये टीव्हीचे आकर्षण वाढत चालले असून, सहजपणे स्मार्टफोन हाताळणाऱ्या नव्या पिढीमध्ये विशेषत: मुलांमध्ये ज्ञान फार वेगाने वाढत आहे. हे ज्ञान त्यांच्यामध्ये टिकणे व त्याद्वारे त्यांची प्रगती होणे अपेक्षित असल्याने, नव्या पिढीचे हे वाढते ज्ञान शिक्षकांसमोरील नवीन आव्हान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केले. जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील होत्या.
आ. पाटील म्हणाले की, सध्या माहितीशास्त्र वेगाने वाढत आहे. ज्ञानाची दारे उघडल्याचे चांगले चित्र यामुळे समोर आले आहे. त्यातूनच ग्रामीण भागातील मुलेही शिक्षणासाठी देश-विदेशात जात आहेत. वाढलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे पुढे जाण्याची स्पर्धाही तीव्र झाली आहे. त्यातूनही मराठी माध्यमाचा विद्यार्थी जगात गुणवत्ता सिध्द करत आहे. त्यामुळे शिक्षकांसमोरील आव्हाने अधिक बिकट आणि प्रभावी झाली आहेत. जिल्हा परिषद शाळांची प्रगती लक्षात घेता, याठिकाणचे शिक्षक हे आव्हान निश्चितपणे पेलतील.
गोरगरिबांना शिक्षण देणारी शाळा म्हणून आजही जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. हे भान शिक्षकांमध्ये असल्यानेच अलीकडील काळात शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली की काय बदल होऊ शकतो, हे शिक्षकांनी दाखवून दिले आहे. शिक्षकांना स्वातंत्र्य देण्यात महत्त्वाची भूमिका आघाडी सरकारने बजावली होती. समायोजनासारखी यंत्रणा उभारून शिक्षकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठीही आमच्या सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही पाटील यांनी सांगितले.
स्नेहल पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या या शिक्षकांचा यथोचित गौरव व्हायलाच पाहिजे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ होत असून, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनंदा पाटील, समाजकल्याण सभापती कुसूम मोटे, शिक्षणाधिकारी महेश चोथे, नीशादेवी वाघमोडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुरस्कारप्राप्त शिक्षक...
प्राथमिक विभाग - शिवाजी पाटील (शिराळा), शरद पाटील (वाळवा), बाळासाहेब भोसले (मिरज), मुनाफ नदाफ (तासगाव), महेशकुमार चौगुले (पलूस), मंगेश बनसोडे ( कडेगाव), स्वाती शिंदे ( खानापूर), मोहिनी मुढे (आटपाडी), तारीश आत्तार (कवठेमहांकाळ), गुंडा मुंजे (जत), सातलिंगा किट्टद (जत), मुश्ताक अहमद पटेल (कुपवाड).
माध्यमिक विभाग - दिलीप वाघमोडे (जत), प्रमोद डोंबे (आटपाडी), विजय सगरे (खानापूूर), हारूण जमादार (तासगाव), विजयकुमार पाटील (कवठेमहांकाळ), संजीवनी मोहिते (पलूस), बाळासाहेब माने (कडेगाव), दादासाहेब पाटील (मिरज), विठ्ठल मोहिते (म.न.पा. क्षेत्र), मैमुन्निसा तांबोळी (वाळवा), संजय पाटील (शिराळा), उल्हास माळी (जत), संदीप रोकडे (शिराळा), अनुजा पाटील (मिरज).
शिक्षकांच्या मनोगताने जयंतरावही प्रभावित
‘शिक्षक पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या मनोगताने जयंत पाटील प्रभावित झाले होते. वाळवा तालुक्यातील शिक्षक शरद पाटील, कार्वे येथील कवयित्री स्वाती शिंदे, अनुजा पाटील यांचे मनोगत प्रभावी झाले. शरद पाटील यांनी सादर केलेल्या गाण्याला जयंतरावांनी दाद दिली. तसेच स्वाती शिंदे यांचे ओघवत्या शैलीतील भाषण ऐकून, त्यांना थेट जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे उभे राहण्याची आॅफरच जयंतरावांनी देऊन टाकली.
इंग्रजी शाळांच्या फॅशनला आळा
पाच वर्षापूर्वीपर्यंत खेड्यापाड्यातही सुटा-बुटातील विद्यार्थी आणि त्यांचे इंग्रजी बोलण्याचे पालकांना अप्रूप होते. मात्र, जिल्हा परिषद शाळांनी हे आव्हान पेलत गुणवत्ता वाढविल्याने, आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फॅशन कमी केली आहे. याचे श्रेय प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नाला द्यायला हवे, असेही जयंत पाटील म्हणाले.