बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:34 PM2019-05-29T23:34:24+5:302019-05-29T23:36:17+5:30
गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे.
- शरद जाधव ।
सांगली : गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक्का घसरला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे परीक्षेपेक्षा जेईई मेन्स, नीटकडे लक्ष असल्यानेही निकालावर परिणाम झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भरभरून मिळणाऱ्या टक्केवारीची चर्चा होत असे. यंदा मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कृतिपत्रिका आधारित मूल्यमापन पध्दतीची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसह भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. बदललेल्या या पध्दतीचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याचे दिसून येत आहे.
त्यातच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही परिणाम जाणवत आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स् व फिजिक्स-केमिस्ट्री-बायॉलॉजी या ग्रूपिंगपुरता अभ्यास करून जास्तीत-जास्त वेळ नीट व जेईई मेन्सच्या तयारीकडे लक्ष देत आहेत. प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप, काठिण्य पातळीतील वाढ झाली असताना, त्याकडे लक्ष देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी इतर परीक्षांना प्राधान्य दिल्यानेच निकालात घसरण झाली आहे.
राज्य मंडळाने बदललेल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचेही चित्र आहे. नवीन पध्दतीत वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले आहेत. विज्ञान शाखेत तीन तासात २९ प्रश्न सोडवावे लागत होते. जे पूर्वीच्या पध्दतीत पेपर एक व पेपर दोन असे विभागले होते. याचा परिणाम होऊन ९० टक्क्यावर गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. कला व वाणिज्य शाखांच्या गुणांवर याचा तितकासा परिणाम झालेला नाही.
बदलत्या ‘ट्रेंड’मुळेच : निकाल घसरला
विद्यार्थ्यांनी आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीचे पुरेसे आकलन न करता, ‘नीट’ व जेईई मेन अॅडव्हान्सच्या तयारीकडे अधिक लक्ष दिल्यानेही परिणाम झाला आहे. दोन्ही परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांचा वापर वाढत आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून झाला नाही. गेल्या काही वर्षांत केवळ ग्रूपिंगसाठी बारावी परीक्षा द्यायची व बहुतांशवेळा वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा ‘ट्रेंड’ विद्यार्थ्यांत आल्यामुळेही निकाल घसरला आहे.
दहावीच्या निकालावर होणार परिणाम
बारावीच्या निकालावर सरासरी दहा टक्क्याचा परिणाम झाला असल्याने आता दहावीच्या निकालाकडेही लक्ष लागले आहे. दहावीसाठी तोंडी परीक्षा बंद झाल्याने इंग्रजीच्या निकालावर परिणाम जाणवणार आहे.
‘सीबीएसई’शी स्पर्धा
सीबीएसई, आयसीएसई व इतर बोर्डाचा टक्का वेगाने वाढत आहे. त्यामुळे बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणाºया अभ्यासक्रमांसाठी राज्य परीक्षा मंडळाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठी स्पर्धा सहन करावी लागणार आहे. त्यात टक्केवारी घसरल्याने अडचणी वाढल्या आहेत.
घसरलेल्या निकालाला बदलती परीक्षा पध्दत हे एकच कारण नाही. पहिल्यांदाच कृतिपत्रिकांचा वापर केला. बुध्दिमत्तेला, कल्पनाशक्तीला, गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात त्याचे महत्त्व लक्षात येईल.
- महेश चोथे, शिक्षणाधिकारी.