सांगली जिल्ह्यात नऊ कोटींची ‘जीएसटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:28 PM2019-02-26T23:28:58+5:302019-02-26T23:29:28+5:30
जिल्ह्यातील जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या २६ हजारपैकी तीस टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत. विवरणपत्रे दाखल न करता सुमारे नऊ कोटींची कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना जीएसटी विभागाने नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.
मिरज : जिल्ह्यातील जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या २६ हजारपैकी तीस टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत. विवरणपत्रे दाखल न करता सुमारे नऊ कोटींची कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना जीएसटी विभागाने नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.
केंद्रीय जीएसटी सांगली विभागाकडे २६ हजार वस्तू व सेवा पुरवठादारांची नोंदणी आहे, मात्र यापैकी सुमारे ७ हजार व्यावसायिकांनी विवरणपत्र दाखल न करता कर चुकवेगिरी केल्याचे उघड झाले आहे.
संबंधित व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून १५ टक्के दंड व २४ टक्के व्याजासह थकीत जीएसटी कराची वसुली करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सुमारे साडेतीन कोटीची थकीत कर वसुली झाली आहे. जिल्ह्यात सुमारे नऊशे कोटी रुपये जीएसटी कर संकलनाचे उद्दिष्ट असून, यापैकी केंद्रीय जीएसटी विभागाकडे दोनशे पन्नास कोटी रुपये करसंकलन होते. विवरणपत्रे दाखल न करता कर चुकवेगिरीप्रमाणेच बोगस बिलांद्वारे जीएसटी कर बुडविण्याचा प्रकारही उघडकीस येत आहे. पनवेल येथील मोक्ष अलॉयज् यासह अन्य कंपन्यांना सांगलीतील एका उद्योगाकडून घेतलेल्या बोगस बिलांच्याआधारे कोट्यवधी रुपयांचा कर परतावा घेतला आहे. याप्रकरणी सांगलीतील संबंधित उद्योगाचीही चौकशी करण्यात येत आहे. राज्य जीएसटी विभागाने ही विवरणपत्रे दाखल न करता कर चुकवेगिरी करणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे.
जीएसटी संकलन वाढले
वस्तू व सेवा कराच्या वसुलीद्वारे कर संकलनात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर न भरलेल्या ३० टक्के व्यावसायिकांकडून दंडात्मक कारवाईसह करवसुली झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ५० हजारपेक्षा जादा किमतीच्या मालवाहतुकीसाठी ई-वे बिलाची तपासणी करण्यात येत आहे.
वसंतदादा, माणगंगा कारखान्यांना नोटीस
वसंतदादा व माणगंगा या साखर कारखान्यांनाही जीएसटी विवरणपत्रे भरली नसल्याने नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
हळद, गूळ, बेदाण्याची वसुली सुरूच
सांगली मार्केट यार्डात हळद, गूळ व बेदाण्याच्या सुमारे १०० व्यापाऱ्यांना मागील पाच वर्षांच्या थकीत सेवा कर वसुलीच्या नोटिसा जीएसटी विभागाने दिल्या आहेत. या कारवाईविरोधात गेल्या महिन्यात व्यापाºयांनी बंद आंदोलन केले होते. खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतरही थकीत कर वसुलीचे काम थांबलेले नाही. १ फेब्रुवारीपासून पुन्हा थकीत सेवा कर वसुली सुरू करण्यात आली असून, आणखी काही व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत.