जीएसटी संकलनामध्ये सव्वाआठ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:31 PM2019-05-04T15:31:37+5:302019-05-04T15:32:14+5:30
देशात एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटीच्या पुढे गेले असून, सांगली जिल्ह्यातही जीएसटी वसुली ७७.७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ८.२५ कोटी रुपये जादा संकलन झाल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरज : देशात एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटीच्या पुढे गेले असून, सांगली जिल्ह्यातही जीएसटी वसुली ७७.७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ८.२५ कोटी रुपये जादा संकलन झाल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य जीएसटी विभागाने जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी रुपये महसूल जमा केला आहे. करदात्यांच्या नोंदणीतही वाढ झाली आहे. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात ६९.५२ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात गतवर्षी एप्रिलपेक्षा ८.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला असून, ही ११.८६ टक्के जास्त करवसुली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात कारवाईच्या बडग्यामुळे विवरणपत्र व कर भरणा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. चालूवर्षी एप्रिल महिन्यात जीएसटी महसूल ७७.७७ कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय जीएसटी २७.६० कोटी रुपये व राज्य जीएसटी ३१.९० कोटी रुपये आहे.
आंतरराज्य जीएसटी १८.२४ कोटी रुपये आहे, तर तंबाखू, सिगारेट, गुटखा, विदेशी वाहने यापासून भरपाई उपकर ०.०२ कोटी रुपये इतका आहे. जिल्ह्यात सध्या नोंदणी असलेल्या एकूण २८ हजार ६० नोंदणीकृत व्यावसायिकांपैकी ९ हजार २०० करदाते केंद्रीय जीएसटी विभागाकडे व १८ हजार ७०० करदाते राज्य जीएसटी विभागाकडे आहेत.