कोरोनाचे सावट, तरीही यंदा सणासुदीत मोठी उलाढाल, जीएसटीमध्ये १८ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 04:11 PM2021-12-07T16:11:15+5:302021-12-07T16:12:09+5:30
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीला बाजारात झालेल्या उलाढालीमुळे जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सांगली : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर साजरे झालेल्या सणांपेक्षा दुसऱ्या लाटेनंतर सणासुदीत उत्साह अधिक होता. त्यामुळे यंदाच्या सणांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे पहावयास मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यापेक्षा यंदाच्या आठ महिन्यात जीएसटीचा महसूल तब्बल १८ टक्क्यांनी वाढला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांनी अर्थचक्रावर मोठा परिणाम केला होता. उद्योग, व्यावसाय, शेतीमालाची निर्यात यांना मोठा दणका बसला होता. त्यामुळे कोरोनापूर्वीच्या महसुलाशी तुलना करता २०२० मध्ये महसुलात घट झाली होती. सणांत उलाढालही फारशी नव्हती. २०२१ मध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर आलेल्या सणांमध्ये खरेदीदारांचा उत्साह अधिक होता. बाजारपेठांमधील या उत्साहामुळे आर्थिक उलाढाल वाढली. कृषी, औद्योगिक, व्यापार या क्षेत्राला दिलासा मिळाला. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीला बाजारात झालेल्या उलाढालीमुळे जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षी एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या महिन्यात ४८२ कोटी जीएसटी गोळा झाला होता. एप्रिल २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या काळात ५७० कोटी जीएसटी गोळा झाला. तुलनेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात जीएसटी महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत ८८ कोटींची म्हणजेच १८ टक्के वाढ दिसत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर २०२० या महिन्यात ६९ कोटी जीएसटी उत्पन्न मिळाले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये ७४ कोटी जीएसटी संकलन झाले आहे. म्हणजे नोव्हेंबर मध्ये तुलनेते ५ कोटीची म्हणजेच ६ टक्के वाढ झाली आहे.
पुढील चार महिने आव्हानात्मक
चालू आर्थिक वर्षात सध्या दिलासादायक चित्र बाजारपेठेत दिसत असतानाच आता ओमायक्रॉनचे सावट पुढील चार महिन्यांवर राहणार आहे. तिसरी लाट न आल्यास बाजारपेठेला मोठा दिलासा मिळेल, अन्यथा पुन्हा बाजारातील मंदीचे दुष्टचक्र सुरु होऊ शकते. त्यामुळे व्यापारी, उद्योजक अद्याप आशावादी आहेत.