हमीभाव सहा हजार, तुरीची खरेदी होते पाच हजारला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:04+5:302021-01-14T04:22:04+5:30
सांगली : तुरीचा हंगाम संपत आला तरी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर हमीभाव केंद्र सुरू केलेले नाही. तुरीचा ...
सांगली : तुरीचा हंगाम संपत आला तरी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर हमीभाव केंद्र सुरू केलेले नाही. तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपये असताना खुल्या बाजारात पाच हजार रुपयांनी खरेदी केली जात आहे. बाजारात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तत्काळ हमीभाव केंद्र सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
केंद्र सरकारने शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मका, तूर, मूग, उडीद, आदी शेतीमालाचा हमीभाव निश्चित केला आहे. खुल्या बाजारात हमीभावाचा कमी दर असल्यास शेतीमाल हमीभाव केंद्रावर नेवून तेथे विक्री करावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी हा कायदा केला आहे. मात्र, ज्या यंत्रणेमार्फत हमीभाव केंद्र सुरू केली जातात, त्या यंत्रणेच्या उदासिनतेमुळे वेळेवर हमीभाव केंद्र सुरू केली जात नसल्याचे स्पष्ट झाले. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी केली जात आहे. शिवाय घटतुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरु आहे.
जिल्ह्यातील जत, कवठेमहाकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यात तुरीचे उत्पादन घेतले जाते. पुरेसा पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या महिना ते दीड महिन्यांपासून तुरीचा हंगाम सुरु झाला आहे. सध्या हा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी असल्याने दर सात हजारांपेक्षा अधिक मिळाला. मात्र, त्यानंतर लगेच दर कोसळले, सध्या क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळत आहे. शेतकऱ्यांना पाचशे ते हजार रुपये इतक्या कमी दराने तूर विकावी लागत आहे. तूर हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असल्याचे मार्केटिंग फेडरेशनतर्फे सांगण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना उतारे मिळत नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले आहे. यंत्रणेच्या गाफिलपणामुळेच हंगाम संपत आला तरी हमीभाव केंद्र सुरु झाले नसल्याचे स्पष्ट झाले.