दिघंचीतील पालकमंत्री चषक रोहित स्पोर्ट्सकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:19+5:302021-02-25T04:33:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिघंचीच्या रोहित देशमुख स्पोर्ट्सने पटकावले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिघंचीच्या रोहित देशमुख स्पोर्ट्सने पटकावले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील राज क्रीडा संकुलात स्पर्धा झाली. या स्पर्धेत सुमारे ३२ संघ सहभागी झाले होते.
युवानेते रोहित देशमुख यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. रोहित स्पोर्ट्स साळशिंगमळा (दिघंची) व श्री गणेश स्पोर्ट्स, राजेवाडी या संघांदरम्यान अंतिम सामना झाला. रोहित स्पोर्ट्सचा कर्णधार विकास ढोक याने तुफान फटकेबाजी केली. १०७ धावांचे आव्हान राजेवाडी संघाला दिले. राजेवाडी संघ विजयाचे लक्ष्य गाठताना ७९ धावातच गारद झाला. रोहित स्पोर्ट्सच्या चेतन कालंगेने राजेवाडी संघाचे चार गडी बाद केले. रोहित स्पोर्ट्सने उत्कृष्ट कामगिरी करत पालकमंत्री चषकावर आपले नाव कोरले. चेतन कालंगे याला सामनावीर, तर विकास ढोक याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. अजिंक्यराणा पाटील व रोहित देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
चौकट
मोठी बक्षिसे
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस एक लाख अकरा हजार, दुसरे सत्त्याहत्तर हजार, तिसरे पंचावन्न हजार, तर चौथे बक्षीस तेहतीस हजार होते. स्पर्धेचे लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आले.