पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा
By श्रीनिवास नागे | Published: September 30, 2022 04:25 PM2022-09-30T16:25:09+5:302022-09-30T16:27:24+5:30
मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले.
सांगली : जिल्ह्यात खून, चोऱ्या घरफोड्या, अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांसाठी हे शोभनीय नाही, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी यात सुधारणा करावी अन्यथा गृहविभागाला कळविणार असल्याचा इशारा खाडे यांनी दिला.
पालकमंत्री खाडे यांनी जिल्ह्यातील नियोजन समितीसह सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नवीन समित्यांवर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने यापूर्वी मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, मात्र त्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली कामे सुरु करण्यात येतील. कामगारमंत्री म्हणून पूर्वीच्या कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन व कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संघटित कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतून पावणेतीन लाख कामगार मंत्रालयाकडून दोन लाख रुपये कामगारांच्या घरांसाठी देण्यात येतील. यापेक्षा अधिक लागणारी रक्कम कामगारांना कर्जरुपाने देण्याची योजना आहे. कामगारांना प्रशिक्षण व त्यांची परीक्षा घेण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी शासनाने माझ्या मिरज मतदारसंघासाठी अडीच वर्षात काहीच निधी दिला नाही.मात्र मी मंत्री झाल्यानंतर अडीच महिन्यात तब्बल ९२ कोटी रुपये विकासनिधी आणला आहे. यात मिरज सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांसाठी ३२ कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, महापालिका क्षेत्रात रस्त्यांसाठी ५५ कोटी व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली.
पंतप्रधान मोदी गाजर नाही, विरोधकांना बांबूच दाखवतात!
मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. उद्योग बाहेर जाण्यास पूर्वीचे सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शिंदे गटाचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल व मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल. सांगलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समिती बैठकीस पाचारण केले नसल्याच्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बैठकीस आमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.