पालकमंत्र्यांकडून सांगली जिल्हा वाऱ्यावर
By admin | Published: October 29, 2015 11:35 PM2015-10-29T23:35:25+5:302015-10-30T23:21:08+5:30
पृथ्वीराज पाटील : आत्महत्याग्रस्त एकाही शेतकरी कुटुंबाला भेट नाही
सांगली : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २४ शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारी दफ्तरी केवळ नऊ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्नी मागील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता किती गुन्हे दाखल करावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नाही. जिल्हा नियोजन समिती व पक्षीय कार्यक्रम याव्यतिरिक्त ते जिल्ह्यात कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याविषयी, येथील प्रश्नांविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जे सरकार जिल्ह्यातील एकाही आमदाराला लाल दिवा देऊ शकत नाही, ते सरकार येथील कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय देणार आहे? जिल्ह्यातील सिंचन योजनांचेही भवितव्य कठीण दिसत आहे. कॉँग्रेसने यापूर्वी एआयबीपीतून म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर केला. मोठ्या प्रमाणावर निधी आणून योजना कार्यान्वित केल्या. सध्या ३०० कोटींची मागणी असताना फडणवीस सरकारने ताकारी, म्हैसाळ व टेंभूसाठी केवळ ६२ कोटी मंजूर केले आहेत. जिल्ह्यात २००८ ते २०१४ या कालावधित जलसंधारणाची असंख्य कामे झाली. नरेंद्र मोदी यांनी सांगलीतील सभेत ‘सांगली करुया चांगली’, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात सांगलीच्या पदरात भोपळा पडला. महागाई, दुष्काळ अशा प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा एक वर्षपूर्तीनिमित्त निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी अजित ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)