Sangli News: मिरजेत भाजपमधील गटबाजी उफाळली, पालकमंत्री समर्थकांत दुफळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 05:00 PM2023-09-02T17:00:30+5:302023-09-02T17:02:11+5:30
दुफळीमुळे आगामी महापालिकेसह इतर निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे
सदानंद औंधे
मिरज : आगामी लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे समर्थकांत गटबाजी उफाळली आहे. पालकमंत्री खाडे यांचे पुत्र राजकीय वारसदार म्हणून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे खाडे यांचे स्वीय सहायक मोहन वनखंडे यांनी वेगळी चूल थाटण्याची तयारी सुरू केली आहे. दोन गटांच्या स्वतंत्र दहीहंडीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होणार आहे.
जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी असताना आता मिरजेत पालकमंत्र्यांच्या समर्थकांतही दुफळी निर्माण झाली आहे. पालकमंत्री खाडे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन करणारे स्वीय सहायक व भाजप अनुसूचित जाती- जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे हे खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे यांच्या राजकीय प्रवेशामुळे उपेक्षित आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सुशांत खाडे यांच्या सत्कार कार्यक्रमास अनुपस्थित प्रा. वनखंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. सुशांत यांच्याकडेच सत्तेच्या चाव्या देण्याच्या मागणीमुळे संघर्ष वाढला आहे.
पालकमंत्री समर्थकांत दोन गट पडले आहेत. नाराज वनखंडे यांनी दहीहंडीनिमित्त ताकद दाखवण्याचे ठरवले आहे. जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या सोबत वनखंडे यांनी महायुतीच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे, तर सुशांत यांनी भाजपतर्फे स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन केले आहे. परस्परांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न आहेत. दुफळीमुळे आगामी महापालिकेसह इतर निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
वनखंडे गटाची मोर्चेबांधणी-
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मित्रपक्षांची किंमत वाढली आहे. जनसुराज्य शक्तीकडून मिरज मतदारसंघाची मागणी करण्यात येणार आहे. जनसुराज्य शक्तीला जागा सोडल्यास वनखंडे यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. वनखंडे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे महापालिकेतील माजी समाजकल्याण सभापती आहेत. वनखंडे यांच्या गटाने निवडणुकीच्या तयारीसाठी डावपेच आखले आहेत. त्यामुळे खाडे गटाची अडचण होणार आहे.
शह-काटशह
सुरेश खाडे युवा मंचतर्फे ११ सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाच्या जाहिरातीत प्रा. वनखंडे यांचे छायाचित्र टाळले आहे. विरोधी गटाच्या दहीहंडी कार्यक्रमात सुरेश खाडे यांचे छायाचित्र जाहिरातीत वगळण्यात आले आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी महायुतीच्या दहीहंडीत वनखंडे, जनसुराज्यचे समित कदम, भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.