व्यापाऱ्याविरोधात पालकमंत्र्यांनी दडपशाही करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:44+5:302021-07-22T04:17:44+5:30
सांगली : सांगली आणि मिरजेची बाजारपेठ शुक्रवारपासून उघडली जाईल. व्यापाऱ्यांसोबत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक नियमांचे पालन करून ‘पुनश्च ...
सांगली : सांगली आणि मिरजेची बाजारपेठ शुक्रवारपासून उघडली जाईल. व्यापाऱ्यांसोबत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक नियमांचे पालन करून ‘पुनश्च हरिओम’ करतील. कोरोना नियंत्रणात पालकमंत्री जयंत पाटील अपयशी ठरले आहेत. त्यांनी हे मान्य करून कोरोना प्रतिबंधाच्या अन्य उपाययोजनांवर लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलीस, प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले.
ते म्हणाले, गेली दीड वर्षे व्यापाऱ्यांनी संयम दाखवला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले आहे. साडेतीन महिन्यांत बंद पाळूनही कोरोना कमी झाला नाही. त्यासाठी इतर पर्याय शोधावे लागतील. त्यावर पालकमंत्र्यांनी विचारमंथन करावे. वाळव्याचे दुखणे घेऊन सांगलीवर राग काढू नये. इथली बाजारपेठ मोडण्याचा छुपा डाव कुणी आखला असेल तर त्याला सांगलीकर थारा देणार नाहीत.
पालकमंत्र्यांनी सांगली, मिरजेतील व्यापारीपेठांत येऊन लोकांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. राज्य शासनातील एक वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचा निर्णय ते घेऊ शकले असते. मुख्यमंत्री त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत; पण सांगलीतील अपयश लक्षात घेता मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन मान्यता घ्यायला ते घाबरत आहेत. आता त्यांनी व्यापाऱ्यांना थांबवू नये. शुक्रवारपासून दुकाने उघडली जातील. पोलीस, प्रशासनाने दडपशाही केली तर असहकार पुकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.