म्हमद्याच्या इशाऱ्यावर साथीदारांची धरपकड
By admin | Published: December 13, 2015 11:22 PM2015-12-13T23:22:01+5:302015-12-14T00:08:02+5:30
साक्षीदाराचा खून : संजयनगरमध्ये फिरविले; बघ्यांची गर्दी अन् भीतीने पलायन; ‘वॉचर’चा शोध--मनोज माने खून प्रकरण
सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याच्या खुनातील मुख्य संशयित गुंड म्हमद्या नदाफ यास रविवारी त्याची दहशत असलेल्या संजयनगर परिसरात नेऊन फिरविण्यात आले. म्हमद्याच्या इशाऱ्यावर पोलिसांनी साथीदारांची धरपकड केली. म्हमद्या ज्याच्याकडे इशारा करेल, त्यास पोलीस पकडू लागल्याने म्हमद्याला पाहण्यास गर्दी केलेल्या लोकांनी भीतीने पलायन केले. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल झालेल्या गुंड म्हमद्या नदाफ, सागर शेंडगे, कमर मुजावर यांनी गेल्या महिन्यात मनोज माने याचा अभयनगरमधील बर्वे शाळेसमोर धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण खून केला होता. खुनानंतर रातोराब गायब झालेल्या म्हमद्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांना पायाला भिंगरी बांधावी लागली. तब्बल एक महिन्यानंतर त्याला बेडकीहाळ (ता. चिकोडी) येथे अटक करण्यात यश आले होते. सध्या तो खंडणीच्या गुन्ह्यात अटक व पोलीस कोठडीत आहेत. त्याची कसून चौकशी सुरू आहे. खुनापूर्वी म्हमद्याने त्याचा एक विश्वासू साथीदार मनोजवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी नेमला होता. मनोजची शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात ‘आर्यन’ पान शॉप आहे. हा ‘वॉचर’ होळकर चौकात बसून मनोजच्या सर्व हालचालींची माहिती म्हमद्याला देत होता.खुनादिवशी रात्री दहा वाजता मनोजने दुकान बंद केले होते. तो एकटाच घरी जात असल्याचे समजल्यावर त्याची तिथेच ‘गेम’ करण्याचे नियोजन म्हमद्याचे होते. पण ‘वॉच’ ठेवणाऱ्या संशयिताने मनोज हा मोटारीत बसून घरी येत असून, त्याच्या सोबतीला दोन पोलीस असल्याची माहिती दिली. त्यामुळे म्हमद्याने होळकर चौकात त्याला संपविण्याचा बेत रद्द केला. आज मनोजला संपवायचे, असा त्याने निर्णय घेतला होता. खणभागात त्याचा भाऊ सूरज राहतो. त्याच्याकडून त्याने हत्यारे आणली, अशी माहिती म्हमद्याच्या चौकशीतून पुढे आली आहे. म्हमद्याने मनोजच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जो ‘वॉचर’ ठेवला होता, त्याचे नाव दोन दिवसांपूर्वी निष्पन्न झाले आहे. पण म्हमद्याला अटक केल्याचे समजताच त्याने शहरातून पलायन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. (प्रतिनिधी)
तिघांची कसून चौकशी
मनोज खंडणीच्या गुन्ह्यातील सरकारी साक्षीदार होता. त्याला पोलीस संरक्षणही दिले असताना त्याचा खून झाला. तब्बल एक महिन्यानंतर म्हमद्या सापडला. त्यामुळे तपास मुळापर्यंत जाऊन केला जात आहे. यासाठी अटकेत असलेल्या म्हमद्या, कमर मुजावर व समीर नदाफ या तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. यासाठी पाच अधिकारी तैनात केले आहेत.
तिघांची कसून चौकशी
मनोज खंडणीच्या गुन्ह्यातील सरकारी साक्षीदार होता. त्याला पोलीस संरक्षणही दिले असताना त्याचा खून झाला. तब्बल एक महिन्यानंतर म्हमद्या सापडला. त्यामुळे तपास मुळापर्यंत जाऊन केला जात आहे. यासाठी अटकेत असलेल्या म्हमद्या, कमर मुजावर व समीर नदाफ या तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. यासाठी पाच अधिकारी तैनात केले आहेत.
दोन ‘डझन’ संशयित
मनोजच्या खूनप्रकरणी आतापर्यंत पंधरा संशयितांना अटक झाली आहे. हा आकडा आता दोन ‘डझना’च्या घरात जाणार आहे. फरारी काळात म्हमद्याला मदत करणाऱ्या आणखी पाच, तर म्हमद्याच्या नावावर खंडणी वसूल करणारे पाच अशा दहा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या मागावर पोलीस पथके आहेत.