कडेगाव तालुक्यात उभारली नाही गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:54 PM2018-03-18T23:54:17+5:302018-03-18T23:54:17+5:30
कडेगाव : माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने कडेगाव तालुक्यात दु:खाचे सावट कायम आहे. गावोगावी कार्यकर्ते व ग्रामस्थ अद्याप दु:खातून सावरले नाहीत. यामुळे अपवाद वगळता गावोगावी गुढ्या उभारण्यात आल्या नाहीत. अत्यंत शोकाकूल वातावरण असल्यामुळे गुढीपाडव्याचा सणच केला नाही.
कडेगाव तालुका विकासाचे आदर्श मॉडेल करणारा आणि हरितक्रांती करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची गुढी उभा करणारा आमचा नेता हरपला आहे. त्यामुळे गावोगावी गुढी उभारली नाही.
कडेगाव तालुक्यात कडेगाव शहर, वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, आसद, पाडळी, सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, अंबक, मोहित्यांचे वडगाव, शिरगाव, रामापूर, तडसर, अपशिंगे, सोहोली, शिवणी, नेवरी, शाळगाव, तोंडोली आदी गावातील ग्रामस्थांनी रविवारी गुढीपाडव्यादिवशी गुढी उभारली नाही. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने शोकाकूल ग्रामस्थांनी गुढी उभारली नाही, असे संदेशही सोशल मीडियात फिरत आहेत.
कदम यांनी हजारो कुटुंबांचे संसार फुलविले आहेत. भारती विद्यापीठ व सोनहिरा कारखाना परिवार पोरका झाला आहे. सोनहिरा खोऱ्याचा तर आधारवड निखळला आहे. यामुळे येथे गुढी उभारली नाही, असे गावोगावच्या ग्रामस्थांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक यात्राही रद्द
कडेगाव तालुक्यातील पाडळी, आसद, सोनसळ, मोहित्यांचे वडगाव आदी गावातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भिकवडी खुर्द येथील यात्रेचे धार्मिक विधी वगळता सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित गावातील ग्रामस्थांनी दिली.
वांगीत पतंगराव कदम यांना श्रध्दांजली
वांगी : वांगी (ता. कडेगाव) परिसरात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच गावात एकही घरात गुढी उभारण्यात आली नाही. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे वांगी, शिवणी, शेळकबाव, येवलेवाडी, हणमंतवडिये, वडियेरायबाग गावात दु:खाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे आज गुढीपाडव्याचा सण व गुढी उभी न करता डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. वांगी परिसरात गावात एकही गुढी उभी केली नाही.