गुडेवारांचे लक्ष मजूर सोसायटी चालकांच्या मालमत्तेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:10+5:302020-12-22T04:26:10+5:30
लॉकडाऊन काळात जिल्हा परिषद मुख्यालयात फरशी, रंगरंगोटी, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, आदी कामे झाली. सिद्धनाथ व गणेश सोसायट्यांनी पोटठेकेदारांमार्फत कामे ...
लॉकडाऊन काळात जिल्हा परिषद मुख्यालयात फरशी, रंगरंगोटी, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, आदी कामे झाली. सिद्धनाथ व गणेश सोसायट्यांनी पोटठेकेदारांमार्फत कामे केली. दोन्ही संस्थांचे कॅशबुक, बँक स्टेटमेंट, लेखापरीक्षण अहवाल, साहित्य वापराच्या नोंदी, मजुरांची नावे, पत्ते, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, दोन वर्षांतील कामांची यादी गुडेवार यांनी यापूर्वीच मागविली आहे. आरग येथील सिद्धनाथ आणि लिंगनूर येथील गणेश मजूर सोसायट्यांची नोंदणी रद्द करून काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देऊन गुडेवार यांनी संबंधित संस्थांकडून खुलासा मागविला होता. तो खुलासा संबंधित संस्था चालकांनी जिल्हा परिषदेकडे सोमवारी सादर केला आहे. या खुलाशामध्ये त्यांनी सर्व कामे नियमानुसारच केली आहेत. इमारतीमधील कामांची वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करूनच बिले काढली आहेत. कार्यकारी अभियंता यांच्या सहमतीनेच साहित्याची खरेदी केली आहे. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. सर्व साहित्य दर्जेदार वापरल्याचा खुलासा दोन्ही मजूर सोसायटी चालकांनी केला आहे.
मजूर सोसायटी चालकांच्या खुलाशानंतर गुडेवार यांनी दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यादृष्टीने त्यांनी आयकर विभागासह अन्य शासकीय यंत्रणेकडून दोन्ही सोसायटी चालकांची माहिती मागविली आहे. यामध्ये त्या सोसायटी चालकांची जमीन, वाहने किती आणि कोणत्या प्रकारची आहेत, त्यांची बेहिशेबी मालमत्ता आहे का, याबाबतच्या माहितीचा शोध घेतला जाणार आहे.
चौकट
स्वच्छ कारभारासाठी तपासणी
जिल्हा परिषदेत काम करताना माझा विभाग आणि तेथील अधिकाऱ्यांचा स्वच्छ कारभार असणे ही माझी जबाबदारी आहे. मी एकावरही खुन्नस म्हणून कारवाई करत नाही. स्वच्छ कारभार करणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांचे कौतुक केले आहे. त्यांना लागेल ती चांगली मदत केली आहे. मजूर सोसायट्यांचीही स्वच्छ कारभारासाठीच मी तपासणी करीत आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिली.