आनंदाचा शिधा नाहीच, पाडव्याला खिशातील पैशानेच करा पुरणपोळी
By संतोष भिसे | Published: March 18, 2023 04:37 PM2023-03-18T16:37:01+5:302023-03-18T16:37:28+5:30
गरीब कुटुंबांना १०० रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे
सांगली : गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली, पण तो प्रत्यक्षात पाडव्यानंतरच मिळणार आहे. शासनाने यासाठीच्या निविदा दोनच दिवसांपूर्वी निश्चित केल्या आहेत, त्यामुळे पाडव्याला स्वखर्चानेच पुरणपोळी करावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.
पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. गरीब कुटुंबांना १०० रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. दिवाळीला घरोघरी आनंदाचा शिधा पोहोचल्याने आता पाडव्यासाठीही सर्वसामान्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत. पण पाडवा अवघ्या तीन दिवसांवर आला, तरी शिध्याचा पत्ता नाही. दुकानात तर राहू देच, पण जिल्ह्यातही आलेला नाही. किंबहुना राज्यात कोठेच त्याचा पत्ता नाही.
शासनाने घोषणा केली, तरी त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. त्यातच सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचेही विघ्न येऊन ठेपले. त्यामुळे शिधा लांबणार हे निश्चित झाले आहे. शासनाने शिध्यासाठीची निविदा प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण केली. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर आता शिध्याचे पॅकिंग, कदाचित त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांची छपाई, तेथून जिल्हा गोदामांत पुरवठा अशी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
गोदामात शिधा पोहोच झाल्यावर स्वस्त धान्य दुकानदारांना चलन भरण्याची सूचना दिली जाईल. या प्रक्रियेला आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा पाडव्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पाडव्याचा गोडवा वाढवायचा असेल, तर स्वत:च्या खिशातून खर्च करुन पुरणपोळी करावी लागणार आहे.