गुढीपाडव्याला सांगलीतील सराफ कट्टा सुना

By Admin | Published: April 7, 2016 11:01 PM2016-04-07T23:01:30+5:302016-04-08T00:04:30+5:30

आंदोलनाचा परिणाम : पावणेदोनशे वर्षांत सुवर्ण बाजार पेठेतील परंपरा दोनवेळा खंडित, सात ते आठ हजार कारागीर बसून

Gudi Padwala heard from Saral Katta from Sangli | गुढीपाडव्याला सांगलीतील सराफ कट्टा सुना

गुढीपाडव्याला सांगलीतील सराफ कट्टा सुना

googlenewsNext

अंजर अथणीकर -- सांगली  -साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला दरवर्षी सांगलीच्या सराफ कट्ट्यावर भरणारी खरेदीदारांची जत्रा यंदा दिसणार नाही. अबकारी कराच्या विरोधातील सराफांच्या आंदोलनामुळे गेल्या पावणे दोनशे वर्षांच्या सुवर्णपेठेच्या इतिहासात गुढीपाडव्याच्या सुवर्णखरेदीच्या परंपरेला दुसऱ्यांदा असा खंड पडणार आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीशिवाय नागरिकांनाही हा सण सुना वाटणार आहे.
अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बंदचा उद्या ३८ वा दिवस आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खचाखच भरणारी सांगलीची सुवर्ण बाजारपेठ उद्या (शुक्रवार) सोने खरेदीविना सुनी जाणार आहे. दरम्यान, गेली ३८ दिवस संप सुरु राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे सात ते आठ हजार सुवर्ण कारागीर बसून आहेत. रोजची सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
सुमारे पावणेदोनशेहून वर्षाहून अधिक काळाची सांगलीची सराफ बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात प्रसिध्द आहे. येथील कलाकुसरीच्या दागिन्यांना मागणी आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील घाऊक व्यापाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार कारागीरांकडून कलाकुसरीचे दागिने बनवण्यात येतात. यामध्ये पश्चिम बंगाल, कोकणातून आलेल्या कारागीरांची संख्या अधिक आहे. याची सध्या उपासमार होत आहे.

कडेगावात आज शेकापची काळी गुढी
एफआरपी, दुष्काळप्रश्नी निषेध : तहसीलदारांना निवेदन देणार
कडेगाव : तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही साखर कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी नववर्षाचा गुढीपाडवा आनंदाने साजरा करू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी पाडव्यादिवशी तहसीलदार कार्यालयासमोर काळी गुढी उभी करून शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ऊसदर देणे बंधनकारक आहे. मात्र कारखान्यांनी सुरुवातीस साखरेच्या दरात घसरण झाल्याची सांगत एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास टाळाटाळ केली. राज्य शासनाने ‘एफआरपी’चे तुकडे करत पहिल्या टप्प्यात एफआरपीची ८० टक्के व नंतर २० टक्के रक्कम देण्याचा निर्णय दिला.
आज बाजारात साखरेचे दर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० पर्यंत वाढले आहेत. हे दर वाढलेले असतानाही साखर कारखानदार एफआरपीमधील राहिलेली २० टक्के रक्कम देण्याचे टाळत आहेत. ही बाब ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. उर्वरित रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शासनाने जी ३९ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. त्या गावांना अद्याप दुष्काळाच्या कसल्याही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. त्या गावांना तातडीने वीज बिलात सवलत, विद्यार्थी परीक्षा फी माफी, पीक कर्ज वसुलीस स्थगिती यासह पीक नुकसान भरपाई आदी सुविधा तातडीने देण्यात याव्यात.
नाराजी व्यक्त करण्यासाठी शेकाप कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभी करणार आहेत. निवेदनावर अ‍ॅड. सुभाष पाटील, इंद्रजित पाटील, सुरेश यादव, शहाजी यादव, भारत मस्के, राहुल यादव, गणेश गायकवाड, अमर सिद, विक्रम माळी, महेश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

मी गेली २० वर्षे मुहूर्तावर किमान अर्धा तोळा सोने घेतो. यानिमित्ताने गुंतवणूक होत असते. यावर्षी मात्र मुहूर्त साधता येणार नाही. त्याचबरोबर बाजार पेठ बंद असल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाणही थांबली आहे. जुने सोने विक्रीही थांबली आहे. यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. याचाही सराफांनी विचार करावा.
- अशोक मोहिते, सोने खरेदीदार, सांगली.


लग्नासाठी आम्हाला सोने, दागिन्यांचे बुकिंग करायचे आहे. गेली महिनाभर संप मिटण्याची आम्ही वाट पाहात आहोत. पुढील आठवड्यात आमच्या घरी लग्न सोहळा आहे. आता काय करायचे, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे. दागिना हा संस्कृती, परंपरेचा भाग आहेच, शिवाय ती चांगली गुंतवणूक आहे. लग्नापूर्वी तरी संप मिटावा, अशी अपेक्षा आहे.
- रामचंद्र यमगर, नागरिक, सांगली.

Web Title: Gudi Padwala heard from Saral Katta from Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.