कडेगाव तहसीलवर मराठा मोर्चाचा झेंडा आंदोलकांचा गनिमीकावा : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, दगडफेकीचा प्रकार; विजापूर-गुहागर महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:06 AM2018-07-28T00:06:05+5:302018-07-28T00:07:27+5:30
येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. या
कडेगाव : येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे आंदोलकांनी फोडले. आंदोलकांनी विजापूर-गुहागर महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरला.
शुक्रवारी सकाळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी प्रवेशद्वारावरील विद्युत दिवे दगडाने फोडले. आंदोलकांचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याऱ्या पोलीस कर्मचाºयास दगड मारण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा व फलक झळकविला.
यानंतर संतप्त आंदोलकांनी कडेगाव बसस्थानकाजवळ विजापूर-गुहागर महामार्गाकडे मोर्चा वळविला. रस्त्यावर टायर पेटवून तब्बल तीन तास रास्ता रोको केला. पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक बोलाविले. त्यानंतर तर आंदोलक जास्तच संतप्त झाले. आंदोलकांनी दंगल नियंत्रण पथकाच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक माघारी पाठविले. दरम्यान, तहसीलदार अर्चना शेटे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. तेव्हा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख रास्ता रोको आंदोलनस्थळी आले. त्यावेळी संतप्त आंदोलकांनी त्यांना निवेदन देण्यास नकार दिला. मात्र काही वेळानंतर त्यांच्याकडे पुन्हा निवेदन दिले.
प्रांताधिकाºयांना धक्काबुक्कीचा प्रयत्न
कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख निवेदन स्वीकारण्यासाठी बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलनस्थळी आले, त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्याकडे निवेदन देण्यास नकार दिला. आंदोलकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत काही आंदोलकांनी प्रांताधिकाºयांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्चा समितीने त्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर तासाभराने प्रांताधिकाºयांना बोलावून निवेदन सादर केले. यावेळी प्रांताधिकाºयांनी ठिय्या आंदोलनस्थळी निवेदन न स्वीकारल्याची चूक मान्य केली.
सरकार व मराठा आमदारांचा निषेध
मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या मराठा आमदारांचे आंदोलकांनी अभिनंदन केले. मराठा असूनही मूग गिळून गप्प बसलेल्या राज्यातील अन्य मराठा आमदारांचा आंदोलकांनी निषेध केला. यावेळी आरक्षणाबाबत वेळकाढू धोरण राबविणाºया सरकारचाही आंदोलकांनी निषेध केला.
चिंचणीत कडकडीत बंद
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी चिंचणी (ता. कडेगाव) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. चिंचणी येथील सर्व दुकाने व बाजारपेठ दिवसभर बंद होती. येथील व्यापारी व दुकानदारांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दिला.