फायली मार्गी लावा, अन्यथा घरी पाठवू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:25 PM2017-10-04T23:25:19+5:302017-10-04T23:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मचाºयांना घरी पाठवू, असा इशारा स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते यांनी बुधवारी दिला.
सातपुते म्हणाले की, महापालिकेच्या नगररचना, बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेजसह सर्वच विभागांचा कारभार एकूणच बेशिस्तपणे चालू आहे. या सर्व कारभाराला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात आढावा बैठकीतच कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या स्थायी समिती बैठकीतच पुढच्या सभेत मागील आदेशाची अंमलबजावणी झाल्याचा अहवाल घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ९९ टक्के कामे झाल्याची शिस्त लावली आहे. अधिकाºयांची मनमानी यापुढे चालणार नाही.
नगररचना विभागातही दलालांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी आहेत. दलालाशिवाय फाईल हलत नाही, असा अनुभवही नागरिकांना येतो. फायली गायब होण्याचे प्रकारही घडत होते. बांधकाम परवाने, गुंठेवारीपासून ते नियमितीकरणाच्या प्रक्रियेत या विभागाचा कारभार सुरू होता. त्यामुळे या विभागाच्या अधिकाºयांचे, कर्मचाºयांचे काम, जबाबदाºया आणि वेळेचा लेखाजोखाच मागविला होता. तो बुधवारी सादर झाला. त्यानुसार संबंधित अधिकाºयांना हे काम त्या-त्या वेळेत करण्याची लेखी हमीच घेतली आहे. ज्याला जमत नसेल त्याने तसे कळवावे, त्याला कार्यमुक्त केले जाईल, असेही ते म्हणाले.
महापालिका कार्यालयात अनेकदा अधिकारी, कर्मचारीच उपस्थित नसतात. हजेरी लावून अनेकजण गायब झालेले असतात. कोणत्याही कामासाठी जाताना पूर्वकल्पना दिलीच पाहिजे. बदली व्यक्तीलाही कामाची पूर्ण माहिती असलीच पाहिजे. कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी आता कामगार, अधिकाºयांसोबत अचानक कार्यालयांना भेटी देऊन तपासणी करणार असल्याचेही सातपुते यांनी यावेळी सांगितले.