सांगली रोझ सोसायटीतर्फे जानेवारीत गुलाबपुष्प प्रदर्शन
By admin | Published: December 7, 2015 11:49 PM2015-12-07T23:49:31+5:302015-12-08T00:44:01+5:30
विविध कार्यक्रम : अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा
सांगली : दि सांगली रोझ सोसायटी सांगली आणि मराठा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जानेवारी रोजी हिवाळी गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रोझ सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब चितळे व सरचिटणीस प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, डॉ. प्रकाश पुरोहित यांनी स्थापन केलेल्या दि रोझ सोसायटीच्यावतीने गेली ३७ वर्षे हे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाते. पण सांगली जिल्ह्यात असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता, गेली दोन वर्षे गुलाबपुप्प प्रदर्शन न भरविण्याचा निर्णय सोसायटीच्यावतीने घेण्यात आला होता. यंदा ९ व १० जानेवारी दरम्यान सांगलीत मराठा समाज संस्थेच्या सभागृहात हे हिवाळी गुलाब पुप्प प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शनात व पहिल्या चारही विभागात कोणाही व्यक्तीला भाग घेता येईल.
महाराष्ट्रात मतिमंद व मूकबधीर मुला-मुलींसाठी स्वतंत्र विभाग असून, या मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांच्यासाठी ही स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात येते व त्यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध फुलझाडे हॅन्डीक्राफ्ट व टेराकोटा आदी वस्तू व बागकाम साहित्याचे स्टॉल्स उभे केले जाणार आहेत.
सोसायटीचे ट्रस्ट अध्यक्ष प्राचार्य पी. वाय. मद्वाण्णा, खजिनदार अतुल दप्तरदार, महिला विभागप्रमुख भारती चोपडे, श्रेया भोसले, डॉ. सपना भाटे, नेहा कुलकर्णी, नंदा झाडबुके, शैला देशमाने, डॉ. विवेक शिराळकर, पापा पाटील, गजानन पटवर्धन आदी संयोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)
डेकोरेशनसाठी बक्षिसे
पुष्परचना स्पर्धेत ‘किंग आॅफ दि शो’, क्विन आॅफ दि शो’, ‘प्रिन्स आॅफ दि शो’, ‘प्रिन्सेस आॅफ दि शो’ आणि जनरल तसेच चॅम्पियनशिप, फ्लोरिस्ट डेकोरेशनसाठी ट्रॉफी व इतर विविध ट्रॉफीज, प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत कोणालाही भाग घेता येणार आहे