शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरे सुरू
By admin | Published: November 2, 2015 11:21 PM2015-11-02T23:21:47+5:302015-11-02T23:59:30+5:30
शेतकऱ्यांना दराची चिंता : व्यापाऱ्यांनी दर पाडल्यास उद्योग धोक्यात
सहदेव खोत -- पुनवत--प्रतिवर्षीप्रमाणे शिराळा तालुक्यात कणदूरसह अनेक ठिकाणी गुऱ्हाळघरातील गळिताला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची सुरुवातीपासूनच गूळदरावर नजर राहणार असून, गूळ व्यापाऱ्यांनी दराबाबत जर शेतकऱ्यांची गळपेची केली, तर गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात येणार, असे बोलले जात आहे.
शिराळा तालुक्यात प्रतिवर्षी दिवाळीदरम्यान वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटतात. वारणा पट्ट्यातील या गुऱ्हाळांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. किमान चार महिने तरी अनेकांना या उद्योगातून रोजगार मिळत असल्याने, गुऱ्हाळ उद्योग हे अनेकांचे अर्थार्जनाचे साधन बनले आहे. मात्र प्रतिवर्षी गुऱ्हाळघरांची घटणारी संख्या, ही या उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
यावर्षी तालुक्यात नुकताच गुऱ्हाळांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी, यासाठी कामगार मिळविणे ते टिकवून ठेवणे, उद्योग चालविण्यासाठी गळिताचे योग्य भाडे ठरविणे, शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य भाव मिळवून देणे अशी आव्हाने गुऱ्हाळ मालकांसमोर आहेत. तसेच गुऱ्हाळात ऊस गळीत करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दर मिळविणे, शिवाय गळीत भाडे, तोडणी, खते, मजुरीवरील खर्च वजा करता, काहीतरी पदरात पडावे, ही अपेक्षा आहे.
तालुक्यातील विश्वास, शिवाजी केन, दालमिया व उदय (बांबवडे, ता. शाहुवाडी) या कारखान्यांच्या स्पर्धेतून गुऱ्हाळघरांना ऊस मिळविणे गुऱ्हाळ मालकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यातच साखर कारखान्यांच्या उद्योग दराचे गणित जर विस्कटले, तर शेतकरी गुऱ्हाळांकडे पाठ फिरविणार आहेत.
दराचा गुऱ्हाळांना फटका
कोल्हापूर व कऱ्हाडच्या बाजारपेठेत गूळ व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रति क्ंिवटल चार हजारावर दर न दिल्यास, शेतकरी गुऱ्हाळ उद्योगापासून परावृत्त होण्याची चिन्हे आहेत. याचा फटका गुऱ्हाळ चालकांना बसण्याची शक्यता गुऱ्हाळ चालकांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील गुऱ्हाळे २५
सुमारे ७०० जणांना रोजगार
आदनाचा गळीत खर्च २००० रुपयांच्या घरात
सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल इरादा
दर पाडल्यास उद्योग अडचणीत