‘गुरुकुल’ची गुरुमाऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 08:55 PM2018-10-11T20:55:36+5:302018-10-11T20:56:28+5:30

सुरांच्या विश्वात रमताना...संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना... त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीतविश्वात फडकवित ठेवला.

Gurukuli of 'Gurukul' | ‘गुरुकुल’ची गुरुमाऊली

‘गुरुकुल’ची गुरुमाऊली

Next

- अविनाश कोळी, सांगली.


सुरांच्या विश्वात रमताना...संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना... त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीतविश्वात फडकवित ठेवला. गुरुच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या संगीतकला फुलविताना गायक, कानसेन घडविण्याचे काम करणाºया मंजुषा पोटील या खºया अर्थाने ‘गुरुकुल’च्या गुरुमाऊलीच आहेत. विद्यार्थ्यांना संगीताचे पैलू पाडून संगीताच्या विशाल पटलावर गायकरुपी रत्नांना चमविण्याचे काम त्यांनी अखंडितपणे सुरू ठेवले आहे. गायक, कानसेन घडविताना स्वत: नेहमीच विद्यार्थी दशेत राहणे त्यांनी पसंत केले. संगीत मैफली, संगीत स्पर्धा गाजविताना संगीतक्षेत्रातील नामांकित पदव्या प्राप्त करताना तसेच एका मोठ्या संस्थेच्या उभारणीनंतरही त्यांनी आपले शिष्यत्व अबाधित ठेवत गुरुचरणी रमण्याचे काम आवडीने केले.

मंजुषा पाटील यांचा जन्म सांगलीचा. पं. चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सुरुवातीचे संगीताचे धडे त्यांनी गिरवले. त्यानंतर मिरजेच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदकासह संगीतातील मास्टर डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांचा संगीतक्षेत्रातील प्रवास थक्क करणारा राहिला. नामांकित संगीत स्पर्धां त्यांनी त्यांच्या अस्सल गायकीवर गाजविल्या. यातीलच एक स्पर्धा म्हणजे इचलकरंजीतील संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा संगीत स्पर्धा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरली. येथे त्यांना काणेबुवांसारखे विख्यात गुरु भेटले.

मंजुषा पाटील यांच्या गायकीतील शुद्धता, क्षमता आणि अफलातून उर्जा ओळखून काणेबुवांनी त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यानंतर डॉ. विकास कशाळकर आणि सध्या पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे त्या शिकत आहेत. या गुरुंनी शास्त्रीय संगीताला घराण्याच्या चौकटीत बांधून न ठेवता, सर्व घराण्यांच्या चांगल्या शैली आत्मसात करण्याची दृष्टी त्यांना दिलीच शिवाय सर्व चांगले संगीत मग ते कुठल्याही प्रकारचे असो, त्याकडे डोळसपणे बघायला शिकवले. नवीन पिढीने याच डोळस वृत्तीने शास्त्रीय संगीत गुरुमुखातून शिकले पाहिजे म्हणून मंजुषा पाटील यांनी गुरुकुल संगीत विद्यालयाची स्थापना केली. गेल्या चार वर्षापासून या संस्थेकडून संगीत ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. ज्ञानदानाबरोबरच देशातील नामांकित गायक, वादक व कलाकारांचे सानिध्य येथील विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले आहे.

वर्षातून एकदा विद्यालयामार्फत संगीत महोत्सव घेतला जातो. त्यामुळे गेल्या चार वर्षात संगीत क्षेत्रात सांगलीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सूरातील माधुर्य, त्यावरील पकड, त्याचे अवगत केलेले सौंदर्य शास्त्र, गायनातील संशोधनवृत्ती, निर्मिती कला, गाण्याला तालबद्ध पैलू पाडण्याची कला, संगीतप्रेमींला मंत्रमुग्ध करणाºया तानांची लकब अशा अनेक गोष्टींनी त्यांची कला सजली आहे. संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करताना त्यांनी आपल्यातील साधेपणा जपला. त्यामुळेच दिग्गज कलाकार त्यांच्या गुरुकुलकडे व महोत्सवांकडे आकर्षित होत असतात. कित्येक वर्षापासून त्यांची संगीत तपश्चर्या सुरू आहे. श्वास, हृदयाची स्पंदने, धमण्यांमधील प्रवाह अशा साºया गोष्टींना संगीताने व्यापून टाकत त्यांनी स्वत:ला घडविले.

या घडण्याला त्यांचे गुरू जितके कारणीभूत आहेत, तितकीच त्यांची संगीताप्रती आस्था, प्रेम आणि त्यातून केलेली तपश्चर्यासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळेच संगीत नाट्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व राष्टÑीय पुरस्कार, पं. बसवराज राजगुरु युवा पुरस्कार आदी अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. राष्टÑीय, आंतरराष्टÑीय संगीत मैफलींचा आनंद लुटतानाच रसिकांवर मोहिनी टाकत त्यांच्या हृदयावर राज्य करण्याचे काम गुरुकुलच्या या गुरुमाऊलीने अखंडितपणे सुरू ठेवले आहे.


उपशास्त्रीय गानप्रकारातही वेगळा ठसा...
शास्त्रीय गायकीचे अनेक प्रांत गाजविताना उपशास्त्रीय गायन प्रकारातही मंजुषा पाटील यांनी आपली वेगळी छाप सोडली. ठुमरी, दादरा, अभंग यासारख्या प्रकारातही त्यांनी मैफली जिंकल्या. आत्याधुनिक साधने, जलदगतीने प्राप्त होणारी माहिती, माध्यमांमध्ये होणारे बदल या सर्व गोष्टींचा स्पर्श संगीत क्षेत्राला झाला असला तरी मंजुषा पाटील यांनी गुरुकुल परंपरा टिकावी म्हणून एक चळवळ उभारली आहे. शास्त्रीय संगीताला निश्चितच उज्ज्वल भविष्यकाळ आहे पण त्यासाठी गुरुकुल परंपरा
कायम असायला हवी. यासाठी गुरुंवर श्रद्धा आणि संगीतावर मनसोक्त प्रेम हवे, अशी भावना त्या नेहमी व्यक्त करीत असतात.

 

 

Web Title: Gurukuli of 'Gurukul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.