गुरूकुलची संगीत साधना अखंड राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:50 AM2020-12-17T04:50:53+5:302020-12-17T04:50:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कितीही अडचणींचे बांध आले, तरी गुरूकुलची संगीत साधना अखंडित राहील, असे प्रतिपादन गुरूकुल संगीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कितीही अडचणींचे बांध आले, तरी गुरूकुलची संगीत साधना अखंडित राहील, असे प्रतिपादन गुरूकुल संगीत विद्यालयाच्या संचालिका मंजुषा पाटील यांनी केले.
सांगलीत गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले वर्ग हरभट रोडवरील केळकर वाड्यात सुरू करण्यात आले. त्याचा प्रारंभ संस्थेचे विश्वस्त चिदंबर कोटिभास्कर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यानंतर संगीत शिक्षक कृष्णा मुखेडकर यांनी भक्तिगीत सादर केले. मंजुषा पाटील यांनीही शास्त्रीय गायनातून कार्यक्रमात रंग भरला. या छोट्याशा मैफिलीने संगीत विद्यालयाच्या नव्या पर्वास सुरुवात झाली.
यावेळी मंजुषा पाटील म्हणाल्या की, पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून हे वर्ग भरविले जात आहेत. यापूर्वीही लॉकडाऊन काळात संगीत साधना अखंडित ठेवत गुरूकुलने ऑनलाईन वर्ग घेतले. त्यामुळे गुरूकुलची ही संगीत साधना एखाद्या प्रवाहासारखी सुरू आहे. अडचणींचे बांध आले, तरी ती ओलांडण्याची जिद्द आम्ही बाळगली आहे. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांनी केले.