गुटखा तस्करी : पाचजणांवर गुन्हा सांगलीत कारवाई : चालकास अटक : क्लिनरचे पलायन
By admin | Published: May 15, 2014 11:44 PM2014-05-15T23:44:52+5:302014-05-15T23:46:16+5:30
सांगली : कर्नाटकातून सांगली मार्गे उत्तर प्रदेशला गुटखा व सुगंधित तंबाखूची तस्करी केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : कर्नाटकातून सांगली मार्गे उत्तर प्रदेशला गुटखा व सुगंधित तंबाखूची तस्करी केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ट्रकचालक बालकिशन अर्जुनसिंग वर्मा (वय ४५, रा. उरई, उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली आहे. कारवाईची चाहूल लागल्याने क्लिनर विवेक प्रजापती (रा. रूरा, उत्तर प्रदेश) याने लघुशंकेचा बहाणा करून पलायन केले आहे. कर्नाटक व महाराष्टÑात गुटखा निर्मित्ती व विक्रीस बंदी आहे. तरीही कर्नाटकात चोरुन गुटख्याचे उत्पादन केले जात आहे. तेथून मोठ्या प्रमाणात गुटखा सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. शहर पोलीस व अन्न, औषध आणि प्रशासनाने बुधवारी रात्री बायपास रस्त्यावर सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी ट्रक आला. या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा, दोन हजार किलो सुगंधित तंबाखूचा साठा, सुपारीमिश्रित साडेतीनशे किलो सुपारी असा एकूण चाळीस लाखांचा माल जप्त केला आहे. याशिवाय ट्रकही जप्त करण्यात आला आहे. ट्रकचा चालक बालकिशन वर्मा व क्लिनर विवेक प्रजापती या दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळीच पोलिसांनी पंचनामा केला. चालक व क्लिनरही कसून चौकशी करण्यात आली. चौकशी सुरु असतानाच क्लिनर वर्मा याने लघुशंकेचा बहाणा करुन पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. याप्रकरणी लालकिसन रजपूत (सांगली), मुकेश (रा. कागल, पूर्ण नाव निष्पन्न नाही), के. ए. गुड्डू (कानपूर, उत्तर प्रदेश) या तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. (प्रतिनिधी)