दिल्ली, गुजरात राज्यातून सांगली जिल्ह्यात गुटख्याची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:17 PM2019-04-14T15:17:19+5:302019-04-14T15:18:37+5:30
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दिल्ली, गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत आहे. माव्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू नजीकच्या कर्नाटक राज्यातून आयात केली जात आहे.
सचिन लाड
सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दिल्ली, गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत आहे. माव्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू नजीकच्या कर्नाटक राज्यातून आयात केली जात आहे. तस्करीत मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांची टोळी सक्रीय आहे. अन्न व औषध प्रशासन विभागासमोर ही तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली. गुटखा बंदीचे पान दुकानदारांनीही स्वागत केले. गुटखा बंदीमुळे माव्याला मागणी वाढली.
माव्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूचा काळाबाजार सुरु झाला. पाच रुपयाला मिळणाऱ्या माव्याचा दर तीस रुपयांच्या घरात गेला. बंदी असूनही त्याची तस्करी केली जात आहे. कर्नाटकातून या तंबाखूची आयात केली जात आहे. गुजरात व दिल्लीतून गुटख्याची तस्करी होत आहे. बंदीच्या नावाखाली दुप्पट दराने त्याची विक्री होत आहे. यामध्ये व्यापारी व दुकानदार मालामाल होत आहेत.
पाळेमुळे खणून काढण्यात अपयश
जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्याची कारवाई होत आहे. कधी पोलीस, तर कधी अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई होते. गुटखा, तंबाखूचा साठा जप्त केला होता. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. तपासाचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. तपासात त्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे तपास पुढे सरकत नाही. कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन संशयित जामिनावर बाहेर येतात. ते पुन्हा तस्करी सुरू करतात. तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यात अपयश येत असल्याने वर्षानुवर्षे हा प्रकार आहे.