गुंठेवारी विकास निधीत गोलमाल

By admin | Published: November 3, 2015 11:36 PM2015-11-03T23:36:56+5:302015-11-04T00:08:27+5:30

सदस्यांच्या तक्रारी : मर्जीतील नगरसेवकांच्या प्रभागात निधी खर्ची

Gutthwari Development Fund Golmaal | गुंठेवारी विकास निधीत गोलमाल

गुंठेवारी विकास निधीत गोलमाल

Next

सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागात विकासाचा बोजवारा उडाला असताना, आता या भागाचा विकास निधी काही ठराविक मर्जीतील नगरसेवकांच्या प्रभागात खर्ची पडत असल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. ज्या भागात गुंठेवारी नाही, अथवा गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत, तेथे निधी खर्च होत आहे. एकूणच गुंठेवारीच्या विकास निधीतील गोलमाल चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
मध्यंतरी महापालिकेने गुंठेवारी भागातील विकास कामांसाठी दीड कोटीचा निधी अंदाजपत्रकात मंजूर केला होता. या निधीतून काही कामे प्रस्तावित करण्यात आली. प्रशासनाकडून काही ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातील कामांनाच प्राधान्य देण्यात आले. इतर सदस्यांना निधी नसल्याचे कारण पुढे करीत त्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. या प्रकाराने सदस्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.
गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करताना नागरिकांकडून प्रशमन शुल्क व विकास निधी महापालिकेने वसूल केला आहे. या निधीचे वितरण, प्रस्ताव दाखल झालेल्या भागातच करावे, अशी तरतूद आहे. नियमितीकरणाचे प्रस्ताव न आलेल्या भागात विकासकामे करू नये, असे आदेश असतानाही प्रशासनाकडून त्याला हरताळ फासला जात असल्याचा सदस्यांचा आक्षेप आहे. त्यासाठी सदस्यांकडून काही कामांचे दाखले दिले जात आहेत. एका नगरसेवकाच्या प्रभागात पन्नास लाखांपेक्षा जादा खर्चाचे दिवाबत्तीचे काम मंजूर आहे. हे काम गुंठेवारी निधीतून केले जाणार असले तरी, ज्या भागात काम प्रस्तावित आहे, तो भाग गुंठेवारीत नाही. आणखी एकाच्या प्रभागात रस्त्याचे ३२ लाखांचे कामही अशाचप्रकारे मंजूर झाले आहे.
सांगलीवाडीतून गुंठेवारी नियमितीकरणाच्या माध्यमातून ११ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या निधीतून किमान विकासकामे व्हावीत, यासाठी नगरसेवक दिलीप पाटील आग्रही आहे. आजअखेर एकही काम झालेली नाही की हा निधीही शिल्लक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दुसरीकडे प्रशासनाकडून महासभेत याबाबतचा खुलासा करण्यात आला. दीड कोटी निधीपैकी ८० लाखच रुपये शिल्लक आहेत. उर्वरित ७० लाख रुपयांची तूट आहे. त्यामुळे गुंठेवारीतील प्रस्तावित कामे थांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण या बाबींची पडताळणी नव्याने करण्याची गरज आहे. त्यासाठी आयुक्त अजिज कारचे यांनी गुंठेवारी निधीचा विनियोग, दाखल प्रस्ताव, बांधकाम विभागाचा कारभार या साऱ्यांची झाडाझडती घेतली पाहिजे, अशी मागणीही सदस्यांतून होत आहे. (प्रतिनिधी)


आयुक्त : लक्ष देणार का?
ाुंठेवारी निधीतील कामे मंजूर करताना हा भाग गुंठेवारी आहे का? तेथून
नियमितीकरणाचे शुल्क जमा झाले आहे का? याचा अभिप्राय बांधकाम विभाग नगररचना विभागाकडून घेतो. त्यांच्या अभिप्रायाशिवाय कामेच मंजूर होत नाहीत. तसेच लेखा विभागाची भूमिकाही महत्त्वाची आहे. पण या तीन विभागात ताळमेळ नसल्याने वाद होत आहे. याकडे आयुक्त लक्ष देणार का? हा प्रश्न आहे.

Web Title: Gutthwari Development Fund Golmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.