हागणदारीमुक्त गावांची हागणदारीयुक्त गावाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:43+5:302020-12-12T04:41:43+5:30
बागणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा करत त्याची अंमलबजावणी केली. तसेच महाराष्ट्र शासनाने ‘निर्मलग्राम’ ही योजना ...
बागणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा करत त्याची अंमलबजावणी केली. तसेच महाराष्ट्र शासनाने ‘निर्मलग्राम’ ही योजना राबवली व या योजनेत बागणी, काकाचीवाडी या गावांना ‘निर्मलग्राम’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; परंतु आता मात्र या गावांत चित्र उलटे दिसत आहे.
बागणी बसस्थानकाजवळ ५० ते ६० घरांची वस्ती आहे. शेजारी मोठा तलाव आहे. तसेच जलस्वराज पाणी पुरवठ्याचे कार्यालय आहे. तेथूनच पांढरमळ्याकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या रस्त्याजवळ सार्वजनिक शौचालये आहेत; परंतु तिथे पाण्याची सुविधा नसल्याने या ठिकाणचे नागरिक रस्त्यालगत शौचालयास बसण्यात धन्यता मानतात. तसेच ऊसतोडी सुरू झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या फडकऱ्यांची खोपटी आली व त्यांनी आपल्या सोयीनुसार मोकळ्या जागेत खोपटी थाटली, परंतु त्यांची शौचालयाची कोणतीच सोय नसल्याने त्यांनी रस्त्याकडेच्या जागेचे शौचालय केले. त्यामुळे बागणी, काकाचीवाडी गावात आत येताना व पांढरमळा भागाकडे जाताना नाक धरुनच प्रवास करावा लागत आहे.
चाैकट
कारवाईची मागणी
टोळी मालकांनी ऊसतोडणी कामगारांसाठी त्यांच्या राहण्याच्या जागी तात्पुरत्या किंवा ट्राॅलीमधील शौचालयाची सोय करावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर घरी शौचालय असून, रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांवर ग्रामपंचायत, गुडमॉर्निंग पथकाने पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करून ग्रामस्थांना होणारा त्रास थांबविण्याची मागणी होत आहे.