हमाल-व्यापारी वादाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Published: January 5, 2015 11:48 PM2015-01-05T23:48:31+5:302015-01-06T00:48:36+5:30

दोन्ही गटाकडून चर्चाच नाही : माथाडी बोर्डाच्या बैठकीस व्यापाऱ्यांची दांडी; मालाचे तीनशे ट्रक सहा दिवसांपासून उभे

Hail-trade dispute farmers hit | हमाल-व्यापारी वादाचा शेतकऱ्यांना फटका

हमाल-व्यापारी वादाचा शेतकऱ्यांना फटका

Next

सांगली : हमाल आणि व्यापारी दोन्ही संघटना आप-आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हमाल पंचायतीने दि. १ जानेवारीपासून सुरु केलेले आंदोलन आज (सोमवारी) सुरुच होते. एक पाऊल मागे सरकण्यास हमाल आणि व्यापारी तयार नाहीत. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचा माल घेऊन आलेले तीनशे ट्रक उभेच आहेत. दिवसाला ट्रक मालकांचे भाडे वाढत असून, त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. शेती मालाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. आंदोलनामुळे व्यापारी, हमालांचे नव्हे, तर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा जिल्हा प्रशासन आणि राजकर्तेही गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे वाटोळे सुरुच आहे.


हमाल पंचायतीच्या आडमुठ्या धोरणाने व्यवहार ठप्प : सारडा

सांगली : हमालीच्या दरवाढीवर चर्चा सुरू असतानाच अचानक १ जानेवारीपासून हमाल पंचायतीच्या नेत्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करून बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प केले आहेत. यामुळे बाजार समितीमधील ६० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यास हमाल पंचायतीचे आडमुठे धोरणच जबाबदार आहे, असा आरोप चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी आज (सोमवारी) केला. हमाल कामावर हजर झाल्याशिवाय त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, हमाली दरवाढीच्या प्रश्नावर १ जानेवारीपूर्वी हमाल व व्यापाऱ्यांमध्ये दोन बैठका झाल्या. हमाल पंचायतीची ७५ टक्के हमाली वाढीची मागणी होती. चर्चेमध्ये ते ३० टक्केपर्यंत खाली आले होते. आम्ही व्यापारीही सात टक्के वाढीवरून नऊ टक्क्यापर्यंत चर्चा सुरू ठेवली होती. अशी सकारात्मक चर्चा सुरू असताना अचानक हमाल पंचायतीने १ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. हमालांच्या या आंदोलनामुळे गेल्या पाच दिवसात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत माल भरून आलेले तीनशे ट्रक येऊन थांबले आहेत. सुमारे ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हमालांच्या आंदोलनामुळे सांगली बाजार समितीकडे येणारा गूळ कोल्हापूर, सोलापूर, बार्शी आदी बाजारपेठेत गेला आहे. काही शेतकऱ्यांचा माल घेवून आलेल्या ट्रक गेल्या तीन ते चार दिवसापासून बाजार समितीत थांबून आहेत. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारहमाल पंचायतीच्या आंदोलनामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी, माथाडी बोर्ड आणि पणन मंत्र्यांना देणार आहे, असे सारडांनी सांगितले.
आंदोलनास पाठिंबा

हमाल पंचायतीच्या आंदोलनास आज (सोमवारी) आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, शंभोराज काटकर आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला. मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळेच संप लादला : विकास मगदूम

सांगली : संपाची सूचना आम्ही पंधरवड्यापूर्वीच दिली आहे. व्यापाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने संप करावा लागला. चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत. सांगलीमध्ये हमालीचा सर्वाधिक दर असल्याची दिशाभूल करणारी निवेदने व्यापाऱ्यांकडून दिली जात आहेत. हमाली वाढ होत नाही, तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे. हा संप व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे लादला गेला आहे, असा आरोप हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी आज (सोमवारी) केला.
येथील मार्केट यार्डमध्ये हमाली वाढवून देण्यासाठी हमालांनी संप सुरू केला आहे. याबाबत मगदूम म्हणाले की, चर्चा चालू असताना अचानक हमालांनी संप केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. हमालीचे दर वाढून मिळावेत म्हणून पंधरा दिवसांपूर्वीच चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. त्यांच्याशी बोलणीही झाली आहेत. पंधरा दिवसात व्यापाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यानंतरच आम्ही आंदोलन सुरु केले आहे. तीस टक्के हमाली वाढ देण्यात यावी, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांकडून याबद्दल कोणतेही ठोस उत्तर नाही. सोमवार, दि. ५ रोजी माथाडी बोर्डात अधिकाऱ्यांनी हमाल-व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. या बैठकीस व्यापारी वेळेत हजर राहिले नाहीत. यावरून कोण मुजोर झाले हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hail-trade dispute farmers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.