हळद सौद्यासाठी व्यापारी दिल्लीला धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:06 AM2017-07-31T01:06:11+5:302017-07-31T01:06:11+5:30

halada-saaudayaasaathai-vayaapaarai-dailalailaa-dhadakanaara | हळद सौद्यासाठी व्यापारी दिल्लीला धडकणार

हळद सौद्यासाठी व्यापारी दिल्लीला धडकणार

googlenewsNext
ठळक मुद्देदहा कोटींची उलाढाल ठप्प


सांगली : जीएसटीमुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे सौदे बंद-सुरू होत असल्यामुळे आजअखेर सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा आता रोजगारावरही परिणाम झाला असून, बंदच्या काळात सुमारे दीड लाख पोती हळद परप्रांतात गेली आहे. याबाबत सांगलीतील व्यापाºयांचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व हळद व्यापारी मनोहर सारडा यांनी दिली.
हळदीवरील वाहतूक, अडत, हमाली आणि अन्य बाबींवर पाच की अठरा टक्के कर लावायचा, याबाबत गोंधळ आहे. जीएसटीची संभ्रमावस्था न संपल्याने हळद व्यापाºयांकडून २८ जूनपासून हळदीचे सौदे थांबवण्यात आले आहेत. किरकोळ स्वरुपाचे सौदे होत आहेत. सांगलीत दररोज सुमारे आठ ते दहा हजार पोती (प्रतिपोते ६० किलो) हळदीची आवक होत असते. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यापसून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हळदीच्या किंमतीवर पाच टक्के कर लागू करण्यात आला आहे. लेव्हीवर पाच की अठरा टक्के कर लागणार? याबाबत गोंधळ आहे. त्यामुळे व्यापाºयांना बिले काढण्यात अडचणी निर्माण झाली आहे.
हळदीसाठी देशामध्ये सांगलीची बाजारपेठ ही महत्त्वाची मानली जाते. सांगलीमध्ये वर्षाला सुमारे वीस लाख पोत्यांची आवक होत असते. यामध्ये परप्रातांतून येणारी हळद ही सात लाख पोत्यांची आहे. हळदीमधून सांगलीला परकीय चलनही मिळते. हळदीची पूड करणारे सुमारे ४० हून अधिक कारखाने सांगली परिसरात आहेत. त्याचबरोबर सुमारे ६० घाऊक व्यापारी सांगलीमध्ये असून, दीड हजार लोकांना हळद व्यवसायातून रोजगार मिळाला आहे. यामध्ये महिला मजुरांची संख्या अधिक आहे.
१ जुलैपासून हळदीचे सौदे अनियमित झाले आहेत. यामुळे याचा रोजगारावरही परिणाम झाला आहे. यावर्षी हळदीचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्याची गरज असताना, सौदे बंद झाल्यामुळे आजअखेर सुमारे दीड लाख पोती हळद ही परप्रांतात गेली आहे. याबाबत लवकर तोडगा न निघाल्यास सांगलीतील व्यापार स्थलांतरित होण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
सांगलीतील हळद व्यापारी आता स्थानिक ठिकाणी प्रयत्न न करता राज्य आणि केंद्र स्तरावर यासाठी प्रयत्न करणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री व केंद्राचे अर्थमंत्री यांच्याशी खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भेट घेणार आहेत. यासाठी नियोजनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. हळद हा शेतीमाल असल्यामुळे जीएसटीतून पूर्णपणे वगळण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
सांगलीत लाख पोती हळद पडून
सांगलीत हळदीचे सौदे बंद झाल्यामुळे सुमारे लाख पोती हळद पडून आहे. स्थानिकबरोबर परप्रांतातून येणारी हळदही थांबली आहे. आंध्र, तमिळनाडू या राज्यांमध्ये सध्या हळदीचा हंगाम जोरदार सुरु आहे. सांगलीची बाजारपेठ अधिक काळ बंद राहून परवडणार नाही. यामुळे बाजारपेठ स्थलांतराचा धोका निर्माण होऊ शकतो.

Web Title: halada-saaudayaasaathai-vayaapaarai-dailalailaa-dhadakanaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.