कासेगावात विधवांसाठी हळदी-कुंकू
By admin | Published: February 7, 2017 11:14 PM2017-02-07T23:14:30+5:302017-02-07T23:14:30+5:30
हरिप्रिया महिला मंडळाचा उपक्रम : जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
इस्लामपूर : पतीच्या निधनानंतरही हिमतीने कुटुंबाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या महिलांचा खास मान, सन्मान व्हायला हवा़. मात्र समाजात उलटेच घडते़ रूढी, परंपरांचा भाग म्हणून सणा-समारंभात त्यांना डावलले जाते. शिवाय त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चुकीचा असतो. अशा विधवा भगिनींना एकत्र करून त्यांना हळदी-कुंकवाचा मान देण्याचा क्रांतिकारी उपक्रम कासेगाव (ता. वाळवा) येथील हरिप्रिया महिला मंडळाने राबविला़ त्यास महिलांचाही प्रतिसाद मिळाला़
कासेगाव येथील सौ़ नंदिनी दिलीप पाटील व काही महिला गेल्या १०-१२ वर्षांपासून या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत़ यावेळी विधवा भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती अंजना तोडकर, प्रा़ श्रीमती प्रतिभा पवार, आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केलेल्या श्रीमती एम़ आय़ तांबोळी, आश्रमशाळेच्या संचालिका श्रीमती जयश्री चौधरी यांच्यासह २५ विधवा भगिनींनी कार्यक्रमास हजेरी लावली़
हळदी-कुंकवाचा मान आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आम्ही पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलत पुढे जात आहोत. यामध्ये आपली साथ नवी उभारी देणारी आहे, अशा शब्दात काही भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सौ़ नंदिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ़ सुजाता माने, सौ़ सारिका किर्वे, सौ़ गौरी कुलकर्णी, सौ. वैशाली कुलकर्णी, सौ़ सुवर्णा शहा, सौ़ स्वाती जगताप, सौ़ रोहिणी रणदिवे, सौ़ शोभा शहा, सौ़ दीपाली विभुते, सौ़ सरिता विभुते, सौ़ मधुरा कुलकर्णी, सौ. रजनी कुलकर्णी, सौ. सुनंदा कुलकर्णी, सौ़ अलका शहा, सौ़ उमा कुलकर्णी, सौ़ स्मिता कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या़
सौ़ स्वाती वाकळे यांनी आभार मानले़ सौ़ मीरा काळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)