अर्ध शतकी कोरेगाव रेल्वे पुलाला झळाली

By admin | Published: May 28, 2017 11:39 PM2017-05-28T23:39:42+5:302017-05-28T23:39:42+5:30

अर्ध शतकी कोरेगाव रेल्वे पुलाला झळाली

The half century saw the bridge of the Koregaon Railway | अर्ध शतकी कोरेगाव रेल्वे पुलाला झळाली

अर्ध शतकी कोरेगाव रेल्वे पुलाला झळाली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार म्हणून ठरलेला कोरेगाव रेल्वे स्टेशननजिक वसना नदीवर असलेला विशाल रेल्वे पूल आजही दिमाखात उभा आहे. या पुलाला ४६ वर्षे पूर्ण झाले असून अहोरात्र सेवा बजावत कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा केंद्रबिंदू बनला आहे. या पुलाच्या रंगरंगोटीला मोठ्या कौतुकाने सुरुवात केली आहे.
पुणे-मिरज रेल्वे मार्गावर महत्वाचा दुवा असलेला आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उंच असलेल्या या पुलाच्या अंगाखांद्यावरुन दररोज ४० ते ४५ रेल्वे गाड्या प्रवास करतात. या मार्गावरील दुहेरीकरणामध्ये कदाचित या पुलावरील वाहतूक बंद करुन लगतच नवीन मोठ्या पुलाची उभारणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर कोरेगावात रेल्वेचे मोठे जंक्शन होते. नॅरोगेज रेल्वेचे पुणे आणि मिरजनंतर कोरेगाव हेच एकप्रकारे मुख्यालय होते. कोरेगाव ही व्यापारी पेठ असल्याने देशभरामध्ये घेवड्यासह अन्य शेतीमालाची कोरेगावातूनच रेल्वेद्वारे वाहतूक होत होती. रेल्वे जंक्शनमुळे शहराला नवीन स्वरुप आले होते. कालांतराने देशाचे उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण रेल्वेद्वारे जोडण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी कोरेगाव रेल्वे जंक्शन रद्द करण्यात आले.
सातारारोड या औद्योगिक नगरीतील रेल्वे सेवा बंद करुन पळशी गावानजिक मुख्य रेल्वे मार्ग साताऱ्याच्या दिशेने वळविण्यात आला आणि जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला नव्याने जरंडेश्वर स्टेशन आकारास आले. सातारा शहराला रेल्वेने जोडणे कृष्णा नदीच्या विशाल पात्रामुळे अशक्य होते. त्यामुळे सातारा तालुक्यातील महागाव येथे रेल्वे स्टेशन उभारण्याचा निर्णय झाला. कोरेगावातून रेल्वे जंक्शन हटविण्यास मोठा विरोध झाला. जनतेतून उठाव झाल्याने अखेरीस नव्या रेल्वे मार्गावर कोरेगाव येथे छोटेखानी रेल्वे स्टेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सत्ताधारी आणि ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री झाली होती. तत्कालीन फौजदाराने हवेत गोळीबार केला होता. १९६५ सालापासून नवीन रेल्वे मार्ग उभारणीचे काम सुरू झाले होते.
कोरेगावच्या पश्चिमेला वसना नदीवर १९७०-७१ मध्ये खडकाळ पात्रात नव्याने विशाल पुलाची उभारणी केली. रेल्वेच्या भाषेत हा वसना पूल असून, त्याची उंची ३० मीटर आहे. सिमेंट क्राँकीट व लोखंडाच्या सहाय्याने या पुलाची उभारणी केली असून, पुलाच्या उंचीमुळे दोन्ही बाजूला मातीचे मोठे भराव टाकून रेल्वे मार्गाची उंची वाढविली. या भरावावरच नव्याने कोरेगाव रेल्वे स्टेशनची उभारणी झाली. वसना पुलाशेजारीच सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर ब्रिटीशकालीन पूल असून, तो उंचीने रेल्वे पुलाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.
वसना पुलाची उभारणी १९७१ मध्ये पूर्ण झाली असून, सुरुवातीला या मार्गावरुन रेल्वेची सेवा कमी होती. दक्षिण मध्य रेल्वेतून पुणे आणि मिरज विभाग मध्य रेल्वेमध्ये समाविष्ठ करण्यात आल्यानंतर दक्षिणेत विशेषत: कर्नाटकात आणि गोव्यामध्ये जाण्यासाठी या रेल्वे मार्गाचा वापर वाढलेला आहे. दिवसभरात या पुलावरुन सुमारे ३५ ते ४५ रेल्वे धावतात. त्यामध्ये मालगाड्यांचे प्रमाण निम्मे आहे. मिरज आणि भिलवडी-किर्लोस्करवाडी येथे राष्ट्रीयकृत तेल कंपन्यांचे डेपो असल्याने इंधनाची वाहतूक रेल्वेद्वारे केली जाते. किमान ४० ते कमाल ४८ डब्यांची मालगाडी या पुलावरुन धावते. पुलाची वजन वाहून नेण्याची क्षमता सुमारे ७० टन आहे.
रेल्वेचा अभियांत्रिकी विभागासह पुलाची देखभाल करणारे स्वतंत्र विभाग असून, ते पुलाची देखभाल व दुरुस्ती करतात. कोरेगाव रेल्वे स्टेशन आणि शिरढोण रेल्वे गेटच्या मधोमध पूल असल्याने त्यावर देखरेख २४ तास असते. त्याचबरोबर रेल्वे कर्मचारी या पुलावरुन चालत जात असल्याने, त्याची निगा राखली जाते. सध्या कोरेगाव ते रहिमतपूर या दोन स्टेशनदरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू आहे, पुलाची डागडुजी केली जात आहे.
वसना पूल नामशेष होण्याची शक्यता
पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वेच्या वतीने हाती घेतले आहे. त्याचबरोबर सातारा-म्हसवड-लातूर या नव्या अशियाई महामार्गाचे काम देखील लवकरात लवकर सुरू आहे. वसना नदीवर रेल्वे आणि रस्ता पूल जवळजवळ असल्याने तेथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने नव्याने पुलाची (सुमारे ५५ मीटर रुंद) उभारणी केली जाणार आहे. त्याद्वारे रस्ता आणि रेल्वे मार्ग शेजारी शेजारी येतील. सध्याच्या वसना पुलाच्या उंचीइतकीच नव्या पुलाची उंची राहणार असल्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या सुत्रांनी सांगितले. त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. सद्य:स्थितीत या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

Web Title: The half century saw the bridge of the Koregaon Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.