शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

By admin | Published: December 14, 2014 10:01 PM2014-12-14T22:01:20+5:302014-12-14T23:49:48+5:30

घसरलेल्या दराचा परिणाम : दिवसाकाठी केवळ दोनच आदणांचे गळीत

Half of the haystack in the Girchalghar | शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

Next

सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळातील गळिताला महिना उलटला तरीही गुळाचा दर २५०० रुपयांच्या वर जात नसल्याने गुऱ्हाळघरे अत्यंत अडचणीत सापडली असून, अनेक गुऱ्हाळघरात दिवसाकाठी केवळ दोनच आदणे निघत असल्याने कामगार व गुऱ्हाळ मालक यांचे नुकसान होत आहे.
शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरे सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. प्रतिवर्षी गुऱ्हाळ हंगामाच्या सुरुवातीला उसदराची कोंडी फुटलेली असायची. सुरुवातीच्या महिन्यात गुळाला ३००० च्या आसपास दर मिळायचा. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या महिन्यात गुऱ्हाळघरांना मुबलक ऊस मिळायचा. पहिल्या महिन्यात गुऱ्हाळांना मुबलक ऊस मिळायचा. गळितासाठी गुऱ्हाळघरांकडे शेतकऱ्यांचा ओघ वाढायचा.
यावर्षी हंगामाला महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या गुळाला कऱ्हाड व कोल्हापूर बाजारपेठेत प्रतिक्विंटल १८००, २१००, २२०० ते २५००, २६०० असा दर मिळाला. यापेक्षा जादा दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आता गळितासाठी धजेनासे झाले आहेत. शिवाय दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा तोटा होऊ लागला आहे.
दरात वाढ होत नसल्यामुळे दररोज चार आदणांनी चालणारी गुऱ्हाळे आता केवळ दोनच आदणांवर आली आहेत. त्यामुळे दोन लाखांवर गुंतवणूक करूनही गुऱ्हाळघरे व्यवस्थित चालत नसल्याने गुऱ्हाळ मालक हबकले आहेत. दराच्या या स्थितीमुळे कामगार ऊस उत्पादक व गुऱ्हाळ मालकांचे नुकसान होत आहे.
भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकेल, असे गुऱ्हाळ मालक, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकंदरीत गुऱ्हाळघराबाबत शासनाची उदासीनता, अडत व्यापाऱ्यांनी केवळ स्वत:च्या फायद्याची घेतलेली भूमिका, वाढता उत्पादन खर्च व सौदे व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक यामुळे गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात आला असून, तमाम गूळ उत्पादकांनी, गुऱ्हाळ मालकांनी गुळाचे दर वाढविण्याची आग्रही मागणी केली आहे.

गुळाला हमीभाव द्या
सौदे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची गूळदराबाबत मोठी पिळवणूक होत आहे. गूळ ही जीवनावश्यक वस्तू आहे. भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने गुळाला प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकणार आहे, असे गुऱ्हाळ मालक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Half of the haystack in the Girchalghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.