तीन हजार दरासाठी निम्मे कारखानदार तयार
By admin | Published: October 18, 2016 11:07 PM2016-10-18T23:07:04+5:302016-10-18T23:07:04+5:30
‘एफआरपी’पेक्षा जादा देणार : उसाचे क्षेत्र ३0 टक्क्यांनी घटल्याचा परिणाम; उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’
सांगली : मागील वर्षातील दुष्काळ, लोकरी मावा आणि हुमणी किडीमुळे जिल्ह्यातील उसाचे ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदा उसाची पळवापळवी होणार आहे. शिवाय साखरेचे दर तीन हजारावर गेल्याने कारखानदारांनी ऊस खेचून नेण्यासाठी उसाला तीन हजारापर्यंत दर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे उसाच्या दरासाठी संघटनांना आक्रमक आंदोलन करावे लागणार नाही, असे चित्र आहे.
सांगली जिल्ह्यात ६९ हजार ७०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. मागील दोन वर्षात ८५ हजार हेक्टर ऊस गळितासाठी उपलब्ध झाला होता. शिवाय, दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील साखर कारखान्यांना कर्नाटक सीमाभाग आणि सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उपलब्ध झाला होता. यावर्षी जिल्ह्यात दहा हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे गळीत हंगामासाठी जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांना ७२ हजार टन ऊस उपलब्ध होणार आहे. सोलापूरमध्ये कारखान्यांची संख्या वाढली आहे. येथील कारखाने सांगली जिल्ह्यातील ऊस पळवू लागले आहेत.
कर्नाटक सीमाभागातही कारखान्यांची संख्या वाढली असून, त्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी काट्यावर प्रतिटन २२०० ते २३०० रुपये दर देऊन ऊसतोडी सुरू केल्या आहेत. याचा विचार केल्यास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याआधीच आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यातील साखर कारखानदारांनी तीन हजार रुपये अंतिम बिल देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे. वाळवा तालुक्यातील काही कारखान्यांनी तीन हजाराचे अंतिम बिल देणारच असल्याचे सांगत उसाची नोंदणी सुरू केली आहे.
साखरेचे दर ३१०० रुपयांच्या पुढे राहिल्यास ऊस उत्पादकांना निश्चित चांगला दर मिळेल, अशी जुजबी प्रतिक्रिया साखर कारखानदारांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी ऊस दराबाबतची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच कारखानदारांकडून दराची घोषणा होणार आहे.
सर्वच कारखानदारांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दि. २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. या परिषदेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.
यावर्षी ऊस दराबरोबरच साखर कारखान्यांचे वजन-काटे आणि साखर उतारा कमी दाखविण्याचा मुद्दा गाजणार आहे. अनेक साखर कारखानदार एफआरपी कमी बसावी, म्हणून उतारा कमी दाखवत आहेत. या प्रश्नाकडेही आता संघटनांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.(प्रतिनिधी)
साडेतीन हजार दर हवा : रघुनाथदादा
साखरेचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांपर्यंत आहेत. भविष्यातही दर स्थिर राहणार आहेत. शिवाय बगॅस, मोलॅसीसचे दरही चढे आहेत. यामुळे ऊस उत्पादकांना साखर कारखानदार प्रतिटन तीन हजार रुपये दर निश्चित देतीलच. मात्र या दरावर आम्ही गप्प बसणार नाही. कारखानदारांनी पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपये दिली पाहिजे. उर्वरित रक्कम अन्य उत्पादनांची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. उसाला पाच हजार रुपये दर मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.