चांदोली धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:33+5:302021-05-12T04:27:33+5:30
चांदोली धरणात सध्या १६.७० टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ४८.५५ आहे. ...
चांदोली धरणात सध्या १६.७० टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ४८.५५ आहे. धरणातून सध्या वारणा नदीत १३९६ क्युसेक, कालव्यातून २५० क्युसेक असा एकूण १६४६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
अद्याप निम्मा पाणीसाठा असल्याने पाण्याची समस्या भेडसावणार नसल्याचे दिसत आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना वरदान लाभलेल्या चांदोली धरणाच्या वसंत जलाशयात सप्टेंबरमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.
जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगार समजले जाते. येथे वार्षिक तीन ते चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. गतवर्षी २४ सप्टेंबरअखेर २५१५ मिलिमीटर पावसाची व यावर्षी २७१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
तरीही अखेरच्या टप्प्यात धरण शंभर टक्के भरले. पावसाचे प्रमाण कमी अधिक झाले तरीही धरण प्रत्येक वर्षी शंभर टक्के भरतेच.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा, कऱ्हाड, वाळवा, मिरज, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, हातकणंगले, शाहूवाडी यांसह अन्य तालुक्यातील शेतीसाठी या पाण्याचा वापर होतो. यंदा धरण २४ सप्टेंबरला शंभर टक्के भरल्याचे प्रशासनाने जाहीर केले. सप्टेंबरपासून सुमारे १७.७० टीएमसी पाणी कालव्यातून व नदीतून सोडून त्याचा सिंचनासाठी वापर झाला आहे.
चौकट
बारमाही हिरवळीने नटलेला परिसर म्हणून चांदोली धरण परिसराला ओळखले जाते. गेल्या तीन - चार दिवसांपासून उन्हाळी पाऊस होत आहे. त्यामुळे हा परिसर पुन्हा हिरवाकंच दिसत आहे.
फोटो- चांदोली धरण पाणीसाठा व हिरवाकंच परिसर दिसत आहे.