माथाडी कायदा वाचविण्यासाठी हमाल, तोलाईदारांचा सांगलीत मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
By अशोक डोंबाळे | Published: December 14, 2023 06:26 PM2023-12-14T18:26:01+5:302023-12-14T18:27:22+5:30
'कायद्याची मोडतोड थांबवा'
सांगली : महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक नवीन माथाडी कायदा / विधेयक मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हमाल, तोलाईदार, हळद महिला माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. शंभर टक्के हमाल, तोलाईदार संपात सहभागी झाले होती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम यांनी दिली.
या माेर्चात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, मनोज सरगर यांनी सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा दिला. विकास मगदूम, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर, पंचायतीचे उपाध्यक्ष प्रल्हाद व्हनमाने, संजय मोरे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निश्चय केला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक नवीन माथाडी कायदा विधेयक मागे घ्यावे, यासह इतर न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील हमाल, तोलाईदार, हळद महिला माथाडी कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
मोर्चामध्ये बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर, राजाराम बंडगर, किरण रूपनर, माथाडी पतपेढीचे अध्यक्ष वसंत यमगर, बजरंग खुटाळे, भारत गायकवाड, दिगंबर तुपलोंढे, शामराव माने, महादेव रूपनर, ईनूस पटेल, महिला आघाडीच्या शालन मोकाशी, लता मदने, मंगल शिवशरण, आदी सहभागी झाले होते.
कायद्याची मोडतोड थांबवा : विशाल पाटील
हमाल माथाडी कायदा अनेक संघर्षांतून तयार झाला आहे. या माथाडी कायद्यामुळे अंगमेहनती, कष्टकरी हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांना आर्थिक व सामाजिक पत मिळाली. या कायद्यामुळे कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. याच कायद्याची महाराष्ट्र शासनाने तोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. या सरकारला सामान्य जनतेच्या दुःखाची जाणीवच नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली.