कामेरीतील अतिक्रमणांवर हातोडा

By Admin | Published: January 21, 2015 10:55 PM2015-01-21T22:55:57+5:302015-01-21T23:54:38+5:30

दहा अतिक्रमणे काढली : ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनेक वर्षांच्या लढ्यास यश

Hammer on encroachments in the camera | कामेरीतील अतिक्रमणांवर हातोडा

कामेरीतील अतिक्रमणांवर हातोडा

googlenewsNext

कामेरी : कामेरी ग्रामपंचायत व महसूल विभागाच्यावतीने गट नं. ३७७९/अ व सिटी सर्व्हे नं. ३0 मधील कामेरी—शिवपुरी रोडलगतची अतिक्रमणे काढण्यास आज (बुधवारी) सुरुवात करण्यात आली. कामेरी—शिवपुरी रस्त्यालगतची राष्ट्रीय महामार्ग ते शिवपुरी रस्त्यावरील गोंधळी बोरपर्यंतची १0 अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून ३७७९/अ सर्व्हे नं.मधील अतिक्रमणे काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून ग्रामसभेत होत होती. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. आज अखेर ग्रामपंचायतीने या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. यामध्ये रमेश थोरात, आनंदा मदने, योगेश मदने, आकाराम पाटील, लालासाहेब मोहिते, हरीभाऊ संकपाळ, महादेव संकपाळ, जमुनाबाई गायकवाड, शंकर भांबुरे यांची जनावरांचे गोठे, शेड, पिठाची गिरणी अशी अतिक्रमणे काढण्यात आली.
या अतिक्रमण मोहिमेत मंडल अधिकारी जे. एम. गात—पाटील, तलाठी एस. के. हुलके, ग्रामसेवक बादशहा नदाफ, सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच अनिल पाटील, मानसिंग पाटील, पोपट पाटील, रणजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.
सर्वांना नोटिसा बजावून अतिक्रमणे काढण्याची यापूर्वीही विनंती केली होती. याला प्रतिसाद न मिळाल्यामुळेच आम्ही कारवाई सुरु केली आहे. स्वत:हून अतिक्रमणे काढून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन बादशहा नदाफ यांनी केले आहे. (वार्ताहर)


सर्व १२० अतिक्रमणे काढणार : नदाफ
निश्चित केलेली सर्व १२0 अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. यामध्ये कोणताही पक्षपात अथवा कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणार आहे, असे मत ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याला किती ग्रामस्थ सहकार्य करणार, याकडे लक्ष लागून आहे.
या अतिक्रमण मोहिमेत मंडल अधिकारी जे. एम. गात—पाटील, तलाठी एस. के. हुलके, ग्रामसेवक बादशहा नदाफ, सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच अनिल पाटील, मानसिंग पाटील, पोपट पाटील, रणजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Hammer on encroachments in the camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.