सांगली जिल्ह्यातील गायरानमधील ११४६८ बांधकामांवर पडणार हातोडा, मास्टर प्लॅन तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:29 PM2022-11-17T12:29:23+5:302022-11-17T12:29:42+5:30
पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत
सांगली : जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील गायरान जमिनीवर ११ हजार ४६८ बांधकामे झाली असून, यावर हातोडा टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेकडून पूर्ण नियोजन झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. यातूनही अतिक्रमणे हटविली नाही तर विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून २७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाले असून ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणेही हटविण्यात येणार असून, जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत.
३१ डिसेंबरपूर्वी अतिक्रमणे हटविणार : राजा दयानिधी
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ची डेडलाइन दिली. यासाठी कालबद्ध नियोजन व आराखडा निश्चित केला. नेमकी जमीन अन् अतिक्रमणे किती याची अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती संकलन सुरू असून, त्यानंतरच अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणे
तालुका गायरान जमिनीतील बांधकामे
मिरज ३५३६
तासगाव २३८७
क. महांकाळ १५५०
जत ५३३
खानापूर ४५४
आटपाडी २४७
कडेगाव १०९३
पलूस १८८
वाळवा १३६३
शिराळा १९७
एकूण ११४६८
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरण करा : उमेश देशमुख
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी १९९१ मध्ये कर्मवीवर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन राज्य शासनाने नियमितीकरण केले होते. त्यानुसार सध्याची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने नियमितीकरण केली पाहिजेत. एकाही अतिक्रमणास प्रशासनाने हात लावू नये, अशी मागणी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे.