जिल्हा परिषद सभेत अधिकारी-सदस्यांत हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:35+5:302021-06-22T04:18:35+5:30
सांगली : जिल्हा परिषदेत ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यावरुन सोमवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यांत चांगलीच हमरीतुमरी झाली. सभा ऑफलाइन ...
सांगली : जिल्हा परिषदेत ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यावरुन सोमवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यांत चांगलीच हमरीतुमरी झाली. सभा ऑफलाइन घेण्यासाठी २५ सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारला. काही सदस्यांनी ऑनलाइन हजेरी लावून सभेवर बहिष्कार घातला. चाळीस सदस्यांचा बहिष्कार कायम असल्यामुळे अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सभाच तहकूब केली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आठ दिवसात सभा ऑफलाइन घेण्याचे आश्वासन त्यांनी सदस्यांना देऊन वादावर पडदा टाकला.
प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ऑनलाइन सर्वसाधारण सभा होती. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती सुनीता पवार, आशा पाटील हे अध्यक्षांच्या वसंत बंगल्यावरून सहभागी झाले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे हे त्यांच्या कार्यालयातून आणि काही सदस्य त्यांच्या घरातून, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमधून ऑनलाईन सहभागी झाले होते.
प्राजक्ता कोरे यांनी दुपारी १२ वाजता ऑनलाईन सभा सुरु केली. ऑनलाइन सभेला विरोध करुन सभापती प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, महादेव दुधाळ, विशाल चौगुले, जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे संजय पाटील, अर्जुन पाटील, संभाजी कचरे, संजीव पाटील, सतीश पवार, भाजपचे डी. के. पाटील, अरुण बालटे, नितीन नवले, सविता कोरबु, सरदार पाटील, शोभा कांबळे, मनोज मुंडगनूर, निजाम मुलाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांच्यासह २५ सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी करत सभा तहकूब करण्याची मागणी केली. सदस्यांनी डुडी यांच्या दालनात सर्व सदस्यांनी प्रवेश करुन सभा ऑफलाईनची मागणी केली. डुडी यांनी सभेबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. अध्यक्ष आणि सचिवांची ती जबाबदारी आहे, असे म्हणत हात झटकले.
यानंतर सर्व सदस्य सभेचे सचिव गावडे यांच्या दालनात घुसले. सभा बेकायदेशीर असून कोरम नसल्याने बंद करण्याची मागणी केली. काही सदस्यांचा आवाजही वाढला होता. सदस्यांच्या या भूमिकेवरून गावडेही संतापले. मी सचिव असलो तरी पीठासन अधिकारी अध्यक्ष असल्यामुळे मी सभा बंद करु शकत नाही, असे सांगितले. यावरुन सदस्य पुन्हा आक्रमक झाले. आम्ही सदस्य आहोत, आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही, असा जाब विचारला. यावरून गावडे आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सर्व सदस्यांनी मिळून गावडे यांना घेराव घालत, तत्काळ सभा थांबवावी, अशी मागणी केली. अखेर अध्यक्षा कोरे, उपाध्यक्ष डोंगरे यांनी सभा आठवड्यासाठी तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सभा ऑफलाईन घेण्यात येईल, असे त्यांनी सदस्यांना आश्वासन दिले. यानंतर वादावर पडदा पडला.
चौकट
मतदानाचा विषय येताच सभा तहकूब
दुपारी पावणेतीनच्या सुमारास तहकूब सभा पुन्हा सुरू झाली. पाणीपुरवठा विभागाच्या विषयांमध्ये देखभाल दुरुस्तीचा विषय आल्यानंतर विरोधी सदस्यांनी मतदान घेण्याची मागणी केली. १ ते ७० विषयावरही मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन प्राजक्ता कोरे यांनी सभाच तहकूब केली.