पूरग्रस्तांसाठी काँग्रेसकडून कर्तव्यपूर्तीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:39+5:302021-07-26T04:24:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित झालेल्या लोकांसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसने कर्तव्यभावनेतून मदतीचा दिलेला हात महत्त्वाचा आहे, असे गौरवोद्गार कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काढले.
सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवारा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राला कदम यांनी भेट दिली. याठिकाणच्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रात दिल्या जाणाऱ्या भोजन, आरोग्य सेवा आणि अन्य सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. पृथ्वीराज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी जितेश कदम उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, कृष्णा नदीला अवघ्या तीन ते चार दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात पाणी आले, त्यामुळे शहरातील लोक पुरात अडकले. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले. त्यांना निवारा केंद्रात आणून सुरक्षितरित्या स्थलांतरित केले. पूर ओसरल्यानंतर तातडीने नुकसानाचे पंचनामे केले जातील तसेच शहरातील आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, या निवारा केंद्रात पूरग्रस्त भागातील २७३ पुरूष, महिला आणि मुले यांची व्यवस्था केली आहे. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, अमर निंबाळकर, आनंदराव नलावडे, रवी खराडे, बिपीन कदम, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, सनी धोतरे, आयुब निशानदार, शेवंता वाघमारे, भारती भगत, आदी उपस्थित होते.