सांगलीतील कुपवाडमध्ये हातगाडीचालकाचा निर्घृण खून, हल्लेखोर फरार; खुनाचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 01:17 PM2023-06-10T13:17:02+5:302023-06-10T13:17:32+5:30
कुपवाड, संजयनगर पोलिसांची पथके घटनास्थळी
कुपवाड : शहरातील वसंतदादा सूतगिरणी ते अहिल्यानगर रस्त्यावर एका दाबेली व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने छाती, डोक्यावर सात वार करून निर्घृण खून करण्यात आला. शुभम् संतोष माने (२२, रा. माळी वस्ती, वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दोन अज्ञात हल्लेखाेरांनी त्याच्यावर वार केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
वसंतदादा सूतगिरणी ते अहिल्यानगर रस्त्यावर यशवंतनगर चौकात मोरया दाबेली सेंटर नावाने हातगाडा आहे. हा गाडा शुभम चालवीत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे शुभमने हातगाडा सुरू केला. रात्री पावणेदहाच्या सुमारास तेथे आलेल्या अज्ञात हल्लेखोराने शुभमवर धारदार शस्त्राने हल्ला केला. तोंडावर आणि छातीवर सात वार झाल्याने रक्तबंबाळ हाेऊन शुभम खाली काेसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, पोलिस कर्मचारी दिगंबर ऐवळे सूतगिरणी चौकातून कुपवाडकडे जात होते. यावेळी एका तरुणाने त्यांना थांबवून यशवंतनगर चौकात तरुणावर हल्ला झाल्याचे सांगितले. ऐवळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी शुभम याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यशवंतनगर मुख्य चौकात दाबेली व्यावसायिकाचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील व संजयनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश डोंगरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपासात दाेघा हल्लेखाेरांनी शुभमवर वार केल्याची माहिती समाेर आली आहे. यातील एका हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असून, कुपवाड व संजयनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी तातडीने रवाना झाली. खुनाचे कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मनीषा कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखाेरांना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.