पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:54 PM2022-11-23T18:54:12+5:302022-11-23T19:57:34+5:30
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती.
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अशीच विधाने केली होती. त्यामुळे, राज्यभरात कोश्यारी यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय पक्षांनी रस्त्यांवर उतरून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. काँग्रेसनेही जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आता, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यालांची ही कृती मुद्दामहूनच होत असल्याचं दावा केला आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, सावरकर वाद आणि राज्यपाल कोश्यारींवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोश्यारी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी कोपऱ्यापासून हातच जोडला. राज्यपालांना कोपऱ्यापासून हात जोडत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागचं कारण सांगितलं. कोश्यारी हे मुद्दामहून अशी विधानं करत आहेत, खरंतर त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये परत जायचंय, त्यांना पुन्हा राजकारणात सक्रीय व्हायचं आहे. मात्र, मोदी त्यांना सोडत नाहीत. म्हणजे काहीतरी करुन ते त्यांना घालवतील. पुढे त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचंय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मी मुख्यमंत्री असतानाची कामे
शुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजित केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.