कासेगावातील दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावले हात

By admin | Published: July 14, 2014 12:21 AM2014-07-14T00:21:44+5:302014-07-14T00:35:03+5:30

घर बांधून देण्याची ग्वाही : ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी

Hands on hand to help a couple in Kasegao | कासेगावातील दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावले हात

कासेगावातील दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावले हात

Next

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील ‘पवार दाम्पत्य निवाऱ्याच्या शोधात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेत येथीलच युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक नेताजीराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, मी घर बांधण्याचा सर्व खर्च करतो, असे स्पष्ट केले.
सदाशिव दादू पवार व चंपा दादू पवार हे मूळचे सदाशिवगड (ता. कऱ्हाड) येथील रहिवासी. १९८३ मध्ये त्यांनी गाव सोडून कासेगाव येथे आसरा घेतला. हे दाम्पत्य कासेगाव येथे येऊन ३२ वर्षे लोटली. येथे मिळेल ते काम करुन दोनवेळच्या पोटाची खळगी भरत होते. कालांतराने बाजारपेठेतील स्वच्छता व पथदिवे चालू, बंद करण्याचे ग्रामपंचायतीकडून काम मिळाले. परंतु याचा मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने दोनवेळच्या जेवणापलीकडे त्यांना काहीही रक्कम साठवता आली नव्हती.
गेल्या ३२ वर्षांपासून त्यांचा संसार हा उघड्यावरच सुरूहोता. गावातील ग्रामपंचायतीसह पदाधिकाऱ्यांनी त्यांना हक्काचं घर बांधून देऊ, असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते सत्यात उतरत नव्हतं. यामुळे ‘लोकमत’ने या दाम्पत्याचा प्रश्न मांडला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच सामाजिक कार्यकर्ते नेताजी पाटील यांनी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, मी घरासाठी लागणारा सर्व खर्च करतो, असा प्रस्ताव ठेवला आहे. पाटील यांनी स्वखर्चातून प्रत्येक समाजासाठी ११ ठिकाणी कूपनलिका मारल्या आहेत. नागोबा मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी मदतही त्यांनी केली आहे. मोठ्या आजारांचा खर्च मुख्यमंत्री निधीतून मिळवून दिला आहे. पाटील यांच्यासह दीपक लाड, पोपट सूर्यवंशी, सुहास वंजारी, प्रतीक हसबनीस, सुरेश माने यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. (वार्ताहर)

--सदाशिव पवार यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांनी ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त आपल्या पत्नीला वाचून दाखवले. यावेळी दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. ‘लोकमत’ने आमच्या प्रश्नाला वाचा फोडली. आता आम्हाला आमच्या हक्काचा निवारा मिळेल, अशीच भावना पवार दाम्पत्यांकडून व्यक्त होत होती.
‘लोकमत’चे अभिनंदन..!
पवार दाम्पत्याचा प्रश्न ‘लोकमत’ने आपल्या हातात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे. आता ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी व पवार दाम्पत्याला हक्काच्या घरात निवारा मिळवून द्यावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.

Web Title: Hands on hand to help a couple in Kasegao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.