बारा गावांचा कारभार महिलांच्या हाती--कवठेमहांकाळ तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:19 PM2017-09-29T23:19:27+5:302017-09-29T23:19:54+5:30
कवठेमहांकाळ : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे.
अर्जुन कर्पे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. यापैकी बारा गावांचा कारभार करण्याची संधी सावित्रीच्या लेकींना मिळणार आहे. सतरा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची धुरा वाहण्याची संधी पुरुषांना मिळणार असली तरी, तब्बल १२ गावांमध्ये महिला आरक्षण असल्याने तेथे महिला सरपंच म्हणून निवडून येण्यासाठीही मोठा संघर्ष होणार आहे.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या चांगलाच रंग भरला आहे. २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यावर्षी सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने सरपंचपद मिळविण्यासाठी सर्वच राजकीय गट शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. २९ पैकी १२ गावात सरपंच पदाचे आरक्षण महिलांच्या वाट्याला गेल्याने या गावांचा कारभार थेट महिलांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे या जागांसाठी सक्षम, सुशिक्षित महिला उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने, पक्षाबरोबरच उमेदवार कसा आहे, त्याची पात्रता काय आहे, हे तपासूनच मतदार मतदान करणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा चेहरा सरपंच पदासाठी देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, गट प्रयत्नशील आहेत.
महिला आरक्षण...
अलकूड (एम)- सर्वसाधारण स्त्री अलकूड (एस)- अनुसूचित जाती स्त्री, चुडेखिंडी- सर्वसाधारण, घाटनांद्रे- सर्वसाधारण स्त्री, केरेवाडी- सर्वसाधारण स्त्री, कोंगनोळी- सर्वसाधारण स्त्री, कुची- सर्वसाधारण स्त्री, कुकटोळी- सर्वसाधारण स्त्री, लोणारवाडी- अनुसूचित जाती स्त्री, नागज- ना. मा. प्रवर्ग स्त्री, सराटी- सर्वसाधारण स्त्री, विठुरायाचीवाडी- सर्वसाधारण स्त्री, या गावांतील सरपंचपद हे महिलांसाठी असणार आहे.
तालुक्यातील आरक्षण...
आगळगाव- सर्वसाधारण, आरेवाडी- अनुसूचित जाती, बोरगाव - ना. मा. प्रवर्ग, ढालेवाडी- सर्वसाधारण, हरोली- सर्वसाधारण, हिंगणगाव- ना. मा. प्रवर्ग, जाखापूर- सर्वसाधारण, जायगव्हाण- सर्वसाधारण, खरशिंग- सर्वसाधारण, लांडगेवाडी- ना. मा. प्रवर्ग, लंगरपेठ- सर्वसाधारण, मळणगाव- अनुसूचित जाती, रांजणी- सर्वसाधारण, शेळकेवाडी- सर्वसाधारण, शिंदेवाडी (हि)- सर्वसाधारण, शिरढोण- ना. मा. प्रवर्ग, वाघोली- अनुसूचित जाती. या ग्रामपंचायतींमधून पुरुषांना सरपंच म्हणून निवडून जाण्याची संधी मिळणार आहे.