सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; जनतेच्या अंगवळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:28 AM2021-07-27T04:28:39+5:302021-07-27T04:28:39+5:30

दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यातील नेत्यांनी स्वत:च्या राजकीय सोयीसाठी अलीकडच्या काळात एक वेगळाच राजकीय पॅटर्न तयार केला आहे. ...

The handshake of the ruling-opposition; Get used to the masses | सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; जनतेच्या अंगवळणी

सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; जनतेच्या अंगवळणी

Next

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यातील नेत्यांनी स्वत:च्या राजकीय सोयीसाठी अलीकडच्या काळात एक वेगळाच राजकीय पॅटर्न तयार केला आहे. आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या सोयीनुसार, कोणताही अडथळा न आणता कारभार सुरु आहे. विरोधक असूनही हातमिळवणी करून सुरु असलेले राजकारण, कार्यकर्त्यांच्याही अंगवळणी पडले आहे. कार्यकर्त्यांनीही संघर्षाच्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे अनेक संस्थांत भ्रष्ट कारभार सुरु असूनही, अनेक समस्या आ वासून उभ्या असूनदेखील सर्व काही आलबेल सुरु असल्याचे चित्र रंगवले जात आहे.

अलीकडच्या काही वर्षांत तासगाव तालुक्यात राजकीय मानसिकतेला छेद देणारा आमदार- खासदार पॅटर्नचा नवा अध्याय सुरु झाला आहे. आमदार राष्ट्रवादीच्या, खासदार भाजपचे दोघांचेही गट तुल्यबळ आणि पारंपरिक विरोधक. मात्र तरीही यांचे राजकारण अंडरस्टँडिंगने सुरु आहे. तासगावचा हा पॅटर्न अधिकृत नाही. ना नेत्यांनी जाहीर मान्य केला आहे; मात्र तरीही तालुक्यातील राजकारण या नेत्यांच्या सोयीनुसार फिरत आहे. आमदार सत्तेत आहेत. तरीही तालुक्यात अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. आमदारांचे वर्चस्व असणाऱ्या काही संस्था भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत. आश्‍वासनांची खैरात निवडणुकीपुरतीच उरली आहे; मात्र या कारभारावर विरोधक म्हणून एकदाही खासदार पाटील यांनी ब्र उच्चारलेला नाही. याउलट राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याऐवजी खच्चीकरण करण्यात आले.

नेमकी अशीच परिस्थिती राष्ट्रवादीत सुरु आहे. नुकतेच यशवंत आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीने अनेक दिवस आंदोलन करून लढा दिला. या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले. पारंपरिक विरोधक असणाऱ्या खासदार पाटील यांच्या संस्थांची कोट्यवधी रुपयांची देणी सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखी कार्यकर्त्यांची मर्यादित संख्या असणारी संघटना आंदोलनात सक्रिय आहे. मात्र अशा परिस्थितीही राष्ट्रवादीकडून थकीत ऊस बिलाबाबत एक शब्दही उच्चारण्यात आला नाही.

तालुक्यात सुरु असलेल्या नेत्यांच्या अंडरस्टॅन्डिंगचा हा नमुने दाखल कारभार आहे. आमदारांविरोधात खासदारांचे मौन आणि खासदारांविरोधात आमदारांनी डोळेझाक करून एकमेकांना सोयीस्कर भूमिका घेतली आहे. सामान्य जनता समस्यांनी होरपळून गेली तरी या नेत्यांना कोणतीच सोयरिक उरलेली नाही. कार्यकर्त्यांनी विरोधक म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तरी नेत्यांकडून पाठबळ न मिळाल्याने विरोधाचा आवाज हवेत विरून जातो. हा बदलता राजकीय पाठ नेत्यांच्या हिताचा असला तरी तासगावच्या जनतेच्या पचनी पडणारा नाही.

000

चौकट :

राष्ट्रवादीच्या अंडरस्टॅँडिंगचा नमुना

तासगाव कारखाना हा तासगाव तालुक्याच्या अस्मितेचा विषय होता. याच कारखान्याभोवती अनेक वर्षे तासगाव तालुक्याचे राजकारण झाले. खासदार संजयकाका पाटील आणि तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या संघर्षात तासगाव कारखाना कळीचा मुद्दा ठरला. हा कारखाना खासगी झाल्यानंतर पहिल्याच गाळप हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत मिळाली नाहीत. राष्ट्रवादीला खासदारांची कोंडी करण्यासाठी ही चांगली संधी होती. राजकीय हेतूसोबतच शेतकऱ्यांनाही फायदा झाला असता.

चौकट :

भाजपच्या अंडरस्टँन्डिगचा नमुना :

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळीच खासदार आणि आमदार गटात कार्यकर्त्यांचे रक्त सांडले. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने राष्ट्रवादीने या ठिकाणी मनमानी कारभार केला. याविरोधात तक्रारी झाल्या. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे चौकशी अहवालात सिद्ध होऊनदेखील बाजार समिती बरखास्त करण्याऐवजी मुदतवाढीचे बक्षीस देण्यात आले. बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आणून राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्यासाठी भाजपला चांगली संधी होती. याविषयी खासदार पाटील यांनी सोयीस्कर डोळेझाक केली. किंबहुना याविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही नाईलाजाने मौन धारण करावे लागले.

0000

Web Title: The handshake of the ruling-opposition; Get used to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.