हाक्केंची भाजपशी सलगी वाढली
By admin | Published: August 2, 2016 12:14 AM2016-08-02T00:14:04+5:302016-08-02T01:05:39+5:30
राष्ट्रवादीत खळबळ : कवठेमहांकाळ तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार
लखन घोरपडे-- देशिंग --कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील नेते व जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांची सध्या भाजप नेत्यांशी जवळीकता वाढली असून, अनेक कार्यक्रमांनिमित्त तसेच एका गूढ चर्चेच्यानिमित्ताने ते एकत्र आले असल्याने हाक्केंच्या या गोष्टीमुळे राष्ट्रवादी घायाळ झाली असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान, हाक्के सुरुवातीला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. परंतु तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची निर्मिती झाली आणि आर. आर. पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीसोबत राहून हाक्के आबांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. यानिमित्ताने तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला. परंतु आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी सत्तेच्या लाटेवर स्वार होऊन खासदार संजय पाटील यांच्या गटात सामील होऊन भाजपवासी झाल्याने तालुक्यात राजकीय भूकंपास सुरूवात झाली.
सध्या तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच चंद्रकांत हाक्के हे भाजपचे खासदार संजय पाटील गटाशी अनेक कार्यक्रमांद्वारे एकत्र आले आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ढालेवाडी येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असूनही भाजपचा सरपंच करण्यासाठी हाक्के यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे हाक्के अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी कोणता निर्णय घेणार, याकडे भागातील जनतेच्या नजरा वळल्या आहेत .
दरम्यान, तालुक्यातील भाजपचे दोन गट निर्माण झाले असून खासदार संजय पाटील यांचा व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचाही एक भक्कम असा गट आहे. परंतु हाक्के हे संजय पाटील यांच्या गटाच्या संपर्कात आले आहेत. सध्या चंद्रकांत हाक्के यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने, अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. परंतु अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
एकंदरीतच राष्ट्रवादी पक्षाला तालुक्यात पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी युवक राष्ट्रवादी तसेच नूतन तालुकाअध्यक्ष यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु ढालगाव भागातून वजनदार नेते म्हणून परिचित असलेले चंद्रकांत हाक्के यांनी भाजपबरोबर घरोबा केल्यास कवठेमहांकाळ राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार, हे मात्र नक्की आहे.
पोटासाठी सर्व काही, पर्वा कुणाची?
मागील एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र आले होते. त्यादरम्यान काही नेत्यांनी चंद्रकांत हाक्के यांना भाजप नेत्यांशी वाढत्या जवळीकतेविषयी छेडले, परंतु त्याला उत्तर देताना हाक्के यांनी आपल्या भाषणात पोटासाठी सर्व काही, पर्वा कुणाची?, असे म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच त्यांचे पुढील राजकीय धोरण काय असणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे