सांगली जिल्ह्यातील पुणदी तर्फ वाळव्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:32 PM2022-04-16T17:32:55+5:302022-04-16T17:43:14+5:30
पुणदी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी मंजुर असल्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले.
दुधोंडी : पलूस तालुक्यातील पुणदी तर्फ वाळवा येथे नवसाला पावणारा मारुती राया अशी ख्याती असलेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ड्रोनच्या मध्यामातून आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. या उत्सव सोहळ्यास पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.
सकाळी साडेसहा वाजता सांप्रदायिक भजनी मंडळाचे वतीने गुलाल पुष्पांच्या वर्षावात श्री मारुती देवाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी 9 ते 12 या वेळेत भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता आंबील नैवेद्याच्या बैलगाड्यांची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
उद्या, रविवारी (दि.१७) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता नागरिकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा तसेच दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याची माहिती संयोजकच्या वतीने देण्यात आली. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी हनुमान केसरी किताब व चांदीची गदा प्रदान करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
या उत्सव काळात राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रा लाड, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पाटील, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव व हजारो भाविकांची उपस्थिती होती. पुणदी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी मंजुर असल्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले.