सांगलीत हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 09:54 AM2018-03-31T09:54:03+5:302018-03-31T09:54:03+5:30
सांगली शहर व परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
सांगली : उधाणलेल्या भक्तीसागरात न्हाऊन निघत शनिवारी (31 मार्च) सांगली शहर व परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही दिसत आहे. सांगलीत अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत. मारुती चौकातील प्रसिद्ध मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 20 भाविक तरुणांनी कृष्णा नदीतून 20 कलश पाणी आणून पंचमुखी मारुती मंदिरात आणले. त्याठिकाणी पहाटे 4 वाजता मूर्तीस स्नान घालण्यात आले. त्यानंतर पंचामृत अभिषेक घालून परशुरामदास बैरागी यांनी पूजा केली. मंगलसनई, भुपाळी सादर करण्यात आली. त्यानंतर 6 वाजून 32 मिनिटांनी जन्मकाळ कीर्तनास सुरुवात झाली. भाविकांनी फुले वाहून हनुमानाचा जयजयकार करीत जन्मोत्सवाचा जल्लोष केला. मारुती व पंचमुखी मारुती मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगर येथील संकटमोचन मारुती मंदिर व नवग्रह शनि मारुती मंदिरातही पहाटेपासून कार्यक्रम सुरू होते. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून मंदिरांमध्ये तयारी सुरू होती. भगव्या पताका, भगवे ध्वज, फुलांची आरास, विद्युत रोषणाईने मंदिरांना साज चढविला होता. रतनशीनगर, कॉंग्रेस भवन चौकातील रिक्षा थांबा, म्हसोबा गल्ली, पंचशीलनगर, विश्रामबाग, माधवनगर याठिकाणच्या मारुती मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होती. काही ठिकाणी महाप्रसादही ठेवण्यात आला होता.
भक्तीमय वातावरण
पहाटे 4 वाजल्यापासून शहरातील विविध मंदिरांमध्ये भक्तीगीते सुरू आहेत. भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. शहर भक्तीमय वातावरणात हरवले आहे.